चंदगड पंचायत समितीच्या सभापतीपदी विलास नाईक व उपसभापतीपदी सौ. संज्योती मळवीकर यांची बिनविरोध निवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2026

चंदगड पंचायत समितीच्या सभापतीपदी विलास नाईक व उपसभापतीपदी सौ. संज्योती मळवीकर यांची बिनविरोध निवड

विलास नाईक                    सौ. संज्योती मळवीकर

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड पंचायत समितीच्या सभापतीपदी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणगाव गणातून निवडून आलेले विलास नाईक व हेरे गणातून निवडून आलेल्या सौ. संज्योती मळवीकर यांची उपसभापतीपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठाशीन अधिकारी तथा तहसिलदार राजेश चव्हाण यांनी या निवडी जाहिर केल्या. गटविकास अधिकारी वृक्षाली जाधव प्रमुख उपस्थित होत्या. 

      चार वर्षानंतर पंचायत समितीचे नवे सभागृह अस्तित्वात आले आहे. मंगळवारी सभापती, उपसभापती निवडी होत्या. सकाळी अर्ज भरण्याच्या विहित वेळेत सभापती पदासाठी विलास नाईक तर उपसभापती पदासाठी सौ. संज्योती मळवीकर यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे नाईक व मळवीकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी राजेश  चव्हाण यांनी जाहिर केले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती नूतन सदस्य व पदाधिकाऱ्यांचा प्रशासन व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

    यावेळी नूतन सभापती विलास नाईक म्हणाले, ``विकासात कधीही कमी पडणार नाही. सभापती पदावर विराजमान झाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. गट-तट बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेवून काम करणार आहे. ज्या वेळी माझी माणगाव गणातून उमेदवारी जाहिर झाली. त्यावेळी लोकांच्यातून हि उमेदवार योग्य असल्याचा सुर कानावर पडला. त्यावेळी मी केलेले काम व माझी पुण्याई कामाला आल्याचा अनुभव आला. प्रत्येक तळागाळातील लोकांना न्याय देण्याची काम करणार आहे.``

    उपसभापती सौ. संज्योती मळवीकर म्हणाल्या,``उपसभापतीपदासाठी नेतेमंडळींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी पात्र ठरवेन. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून काम दाखविण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या पाठीमागे ड. संतोष मळविकर यांचे नेतृत्व माझ्या पाठीमागे आहे.``

   भाजपचे गटनेते रविंद्र बांदिवडेकर म्हणाले, ``चांगल्या कामासाठी विकासासाठी आम्ही विरोधकांच्या खांद्याला-खांदा लावून काम करणार आहे. काम करत असून चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.``

    यावेळी आमदार राजेश पाटील, प्रा. सुखदेव शहापूरकर, विठोबा गावडे, माजी जि. प. शिक्षण सभापती भरमाना गावडे यांची भाषण केले.

   यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे, चंदगडचे नगरसेवक संजय चंदगडकर, माजी जि. प. सदस्य कलाप्पा भोगण,  शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर, विलास पाटील, जिल्हा परिषद सदस्या विद्या पाटील व रचना गावडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी द. ना. नाईक, ब्लॅक पॅंथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment