चंदगड : रविंद्र बांदिवडेकर यांची चंदगड पंचायत समितीच्या भाजप गटनेतेपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2026

चंदगड : रविंद्र बांदिवडेकर यांची चंदगड पंचायत समितीच्या भाजप गटनेतेपदी निवड

 

रविंद्र बांदिवडेकर

संपत पाटील - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदे व विश्वासु समर्थक रवींद्र बांदिवडेकर यांची चंदगड पंचायत समितीच्या भाजप गटनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतेच गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना बांदिवडेकर यांना दिले. 

निवडीचे पत्र रविंद्र बांदिवडेकर यांना देताना जिल्हाधिकारी अमोल येडगे, शेजारी सौ. मनस्विनी कांबळे, व  सौ.  सुवर्णा कुंभार 

पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यात ८ जांगासाठी थेट लढत झाली होती. ८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाला केवळ ३ जागांच मिळवता आल्या. भाजपकडून पंचायत समितीसाठी गवसे गणातून अनुसूचित जातीच्या सौ. मनस्विनी कांबळे, कोवाड गणातील सौ.  सुवर्णा कुंभार व अडकूर गणातून रविंद्र बांदिवडेकर हे भाजपकडून निवडून आले होते. बांदिवडेकर यांनी यापूर्वी नागणवाडी गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. चंदगड तालुका राजकारणात आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे, आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदे व विश्वासू समर्थक रविंद्र बांदिवडेकर यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. 

    रवींद्र बांदिवडेकर हे अडकूर पंचायत समिती गणातून भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत. नागणवाडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी केलेल्या विकासकामांची दखल घेऊन पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, आमदार शिवाजीराव पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बांदिवडेकर यांच्या निष्ठावान कार्याची दखल घेत ही निवड केली आहे.

    भारतीय जनता पक्षाने आणि आमचे मार्गदर्शक आमदार शिवाजीराव पाटील तसेच माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. या पदाच्या माध्यमातून चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे गटनेते रविंद्र बांदिवडेकर त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment