चंदगड पंचायत समिती सभापती - उपसभापती निवड मंगळवारी, उपसभापतीपदावर राजकीय समीकरणांची उत्सुकता - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2026

चंदगड पंचायत समिती सभापती - उपसभापती निवड मंगळवारी, उपसभापतीपदावर राजकीय समीकरणांची उत्सुकता

 


चंदगड / राजेंद्र शिवणगेकर 

    चंदगड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी उद्या होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतीपदासाठी माणगाव गणातून निवडून आलेले प्रा. विलास नाईक यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असल्याने ती निवड केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उपसभापतीपदाच्या निवडीकडे केंद्रित झाले आहे.

    प्रा. विलास नाईक हे माजी आमदार राजेश पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सभापतीपद त्यांच्या गटाकडे जाणार असल्याची चर्चा असताना, उपसभापतीपदासाठी नंदाताई बाभुळकर यांच्या गटातील सदस्याला संधी मिळणार का, याबाबत तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

    चंदगड तालुक्यात यावेळी एक वेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची तालुक्यात युती झाल्याने राज्यभर या घडामोडीची चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या सत्तासमीकरणात युती धर्म पाळला जाणार का, हा प्रश्नही आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

    दरम्यान, उपसभापतीपदासाठी विविध गटांकडून हालचाली सुरू असून सदस्यांमध्ये अंतर्गत चर्चा आणि विचारमंथन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उपसभापतीपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

    उद्याच्या बैठकीनंतर पंचायत समितीच्या नव्या नेतृत्वाचे चित्र स्पष्ट होणार असून सत्तासमीकरणात कोणाचा प्रभाव दिसून येतो, हेही त्यातून समोर येणार आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवड जवळपास निश्चित असली तरी उपसभापतीपदाच्या निवडीभोवतीची उत्सुकता मात्र कायम आहे.

No comments:

Post a Comment