![]() |
| रोजगार मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना खेडूतचे सचिव एम. एम. तुपारे |
चंदगड / प्रतिनिधी
आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून थांबता कामा नये, तर स्वतःमध्ये कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योगजगताला आवश्यक असलेली क्षमता विकसित केली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाल्यास तेही मोठ्या कंपन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. महाविद्यालयांमध्ये आयोजित होणारे रोजगार मेळावे हे विद्यार्थ्यांना शिक्षणातून थेट रोजगाराच्या संधीपर्यंत पोहोचवणारे प्रभावी व्यासपीठ ठरतात, असे प्रतिपादन खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव इंजि. एम. एम. तुपारे यांनी केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उद्योगविश्वाची दारे खुली होत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संवादकौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित केला तर रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतात, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या रोजगार मेळाव्यास चंदगड तालुक्यासह परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटक राज्यांतील विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या मेळाव्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या मुलाखती, निवड प्रक्रिया आणि कौशल्य परीक्षणानंतर तब्बल १०७ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. राजेंद्रकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी जोडण्यासाठी अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एम. एम. माने होते. यावेळी कंपनीचे प्रतिनिधी सुदेश पाटील व चंदन नाईक यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करताना उद्योगक्षेत्रातील अपेक्षा आणि संधी याविषयी माहिती दिली.
या मेळाव्यास दिशा फाउंडेशनचे संचालक संतोष सत्कार, ऋषी शिंदे, रोहित परळे, सचिन पंडित, सुशांत मांडेकर, महेश कुंभार, प्रमोद चलवारी प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. एस. एस. सावंत, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. के. एन. निकम यांच्यासह विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. एस. एन. पाटील यांनी मानले.
या रोजगार मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना थेट रोजगाराची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या कार्याची प्रशंसा होत आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment