'अथक व दीर्घ परिश्रमाने यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या शिनोळीच्या 'वैजनाथ'ची यशोगाथा युवकांसाठी दिशादर्शक - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2026

'अथक व दीर्घ परिश्रमाने यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या शिनोळीच्या 'वैजनाथ'ची यशोगाथा युवकांसाठी दिशादर्शक

  

वैजनाथ पांडुरंग गडकरी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, परिश्रम केल्यानंतर यशाचे शिखर नक्की गाठता येते." हे आपल्या कर्तुत्वाने सिद्ध करणारा तरुण म्हणजे वैजनाथ पांडुरंग गडकरी. 

  चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द या छोट्या गावातून एमबीए इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट पर्यंत भरारी घेऊन पुणे येथे एका नामांकित विदेशी कंपनीत एकापेक्षा अधिक विभागांचा प्रमुख म्हणून यशस्वी कारकीर्द करत आपले कुटुंब, गाव, तालुका व जिल्ह्याचे नाव उज्वल केले. अशा वैजनाथ गडकरी या युवकाची यशोगाथा....!

   घरची गरीबी प्राथमिक शिक्षण चंदगड तालुक्यातील आपल्या छोट्याशा शिनोळी खुर्द गावातील श्रीराम विद्या मंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण गावातीलच वसंत विद्यालयात पार पडले. घरची गरीबी दूर करून मोठे व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे विद्यार्थीदशेत शिक्षकांकडून ऐकलेल्या वैजनाथ ने त्या दिशेने आपले मार्गक्रमण सुरू ठेवले. अकरावी बारावी झाल्यानंतर संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महागाव-गडहिंग्लज मध्ये प्रवेश घेऊन पूर्ण केले. तर एमबीए इन ऑपरेशन मॅनेजमेंट फ्रॉम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी फोंडा गोवा येथून आपल्या अथक परिश्रमाने पूर्ण केली.  

    'शिक्षणाची भूक असेल तर परिश्रमातून यश नक्की मिळते' हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत वैजनाथ गडकरी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

   अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या वैजनाथ चे बालपण अनेक अडचणींचा सामना करत गेले. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल प्रचंड ओढ आणि काहीतरी मोठे करण्याची जिद्द होती. परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.

 उच्च शिक्षणासाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा आधार घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या गावातूनच अगदी अल्प पगाराच्या छोट्या नोकरीपासून करिअरची सुरुवात केली. संघर्ष मोठा असला तरी मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर त्यांनी प्रत्येक अडथळा पार केला.

    विशेष म्हणजे गावात छोटी नोकरी करतच त्याने एक्स्टर्नल माध्यमातून (बहिस्थ विद्यार्थी म्हणून) एमबीए पदवी पूर्ण केली आहे. त्यातही उल्लेखनीय यश संपादन केले. मात्र इतक्यावरच ते थांबले नाहीत. ज्ञानाची ओढ आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती.

    करिअरच्या प्रवासात त्यांना प्रिन्स पाईप्स या नामांकित कंपनीत विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एका विभागापुरते मर्यादित न राहता विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांनी आत्मसात केले. याच ध्येयातून त्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरली आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग, नागपूर येथून MBA in Industrial Safety Management हे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणातही त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. आज आपल्या अथक परिश्रम, सातत्य आणि शिक्षणाच्या बळावर वैजनाथ गडकरी पुणे येथील एका नामांकित विदेशी कंपनीमध्ये एकापेक्षा अधिक विभागांचे Department Head म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत.

    त्यांची ही 'प्रेरणादायी यशोगाथा' आजच्या चंगळवादी जगात वावरणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच एक मोठा संदेश ठरेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment