राजेंद्र शिवणगेकर / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, न्हावेली–उमगाव मार्गावरील खळणेकरवाडी येथे आज पहाटे (ता. २८) घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. पहाटे साधारण चारच्या सुमारास मानवी वस्तीत घुसलेल्या एका महाकाय हत्तीने प्रचंड उत्पात माजवत वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे संपूर्ण खळणेकरवाडीत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
झोपेत असलेल्या ग्रामस्थांना काही कळायच्या आतच रौद्ररूप धारण केलेल्या गजराजाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. विराज सामंत यांच्या घरासमोर उभी असलेली वॅगनआर कार (क्रमांक GA03 Y 1792) हत्तीच्या मार्गात आली. संतप्त हत्तीने सोंडेच्या एका जोरदार फटक्यात ही चारचाकी गाडी हवेत उडवत काही अंतरावर भिरकावून दिली. या प्रचंड धडकेत गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. एवढ्यावर न थांबता हत्तीने परिसरातील दोन ते तीन दुचाकी पायाखाली तुडवत चिरडून टाकल्या.
हत्तीच्या डरकाळ्या, वाहनांच्या कोसळण्याचा कर्कश आवाज आणि जमिनीवर आदळणाऱ्या धातूच्या तुकड्यांचा भयानक गडगडाट ऐकून संपूर्ण वाडी जागी झाली. मात्र समोर दिसणाऱ्या भीषण दृश्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. काही काळ संपूर्ण परिसरात मृत्यूचे भय पसरले होते.


.jpeg)

.jpeg)
No comments:
Post a Comment