चंदगड / सी एल वृत्तसेवा
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील श्रेयस आर. पाटील यांची भारतीय वायू दलात (Indian Air Force) ‘फ्लाईंग ऑफिसर’ (क्लास वन ऑफिसर) म्हणून निवड झाली. बंगलोर येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.श्रेयस यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विवेक इंग्लिश मिडीयम स्कूल, हलकर्णी येथे झाले. त्यानंतर पेठ वडगाव येथील सायरस पुणावाला कॉलेजमधून त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच त्यांनी एन. डी. ए. (NDA) ची तयारी सुरू केली होती. सुरुवातीच्या पाच प्रयत्नांत त्यांना अपयश आले, मात्र त्यांनी हार मानली नाही. पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी आपला सराव सुरूच ठेवला आणि अखेर सहाव्या प्रयत्नात दैदिप्यमान यश संपादन करून भारतीय वायुदलात प्रवेश मिळवला. दीड वर्षांच्या खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षणानंतर श्रेयस यांची ‘क्षेपणास्त्र’ (Missile Section) विभागात नियुक्ती झाली आहे. चंदगड तालुक्यातून फ्लाईंग ऑफिसर या पदापर्यंत पोहोचणारे ते पहिले तरुण ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. श्रेयस हे चंदगड येथील ‘दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनियर कॉलेज’चे प्राचार्य आर. पी. पाटील आणि हलकर्णी येथील ‘विवेक इंग्लिश मिडीयम स्कूल’च्या शिक्षिका सौ. अनिता पाटील यांचे सुपुत्र आहेत. मुलाच्या या यशाबद्दल बोलताना वडील प्राचार्य पाटील भावूक झाले. “हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण असून मुलाच्या जिद्दीमुळेच हे स्वप्न साकार झाले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शांत, नम्र आणि संयमी स्वभाव असलेल्या श्रेयस यांनी आपल्या यशाने ‘अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवा’ असा मोलाचा संदेश दिला आहे.

No comments:
Post a Comment