चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे व निधीच्या वापराबाबतच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी समस्त कोवाड ग्रामस्थांनी शुक्रवार (दि. ३१ जुलै २०२६) रोजी 'कोवाड बंद' ची हाक दिली. या बंदला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाशी चर्चा सुरू झाली. दरम्यान पावसामुळे ही बैठक माऊली मंदिरात हलविण्यात आली. या बैठकीत जानबा कांबळे, विनायक कोले, पांडूरंग वांद्रे, कल्लाप्पा वांद्रे, अभिजित व्हन्याळकर, अजित व्हन्याळकर यांच्यासह ग्रामस्थांनी चौकशीला होत असलेल्या विलंबाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. विविध विकासकामे आणि निधीच्या वापराबाबत कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचारासंदर्भातील मुद्दे त्यांनी मांडले.
गटविकास अधिकारी श्रीमती वृशाली यादव यांनी पंचायत समितीमार्फत करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल ग्रामस्थांच्या स्वाधीन केला. हा अहवाल जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या चौकशी अहवालात विविध बाबींमध्ये अनियमितता निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आणि तत्कालीन सरपंच व कार्यकारिणीकडून खुलासा मागविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट बांधकामाच्या मुद्यावरही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असली तरी अद्याप दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या विषयावर पुढील काळात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
चौकशी अहवालाची प्रत ग्रामस्थांना सुपूर्त करण्यात आली असून पुढील कार्यवाही वरिष्ठ स्तरावरील आदेशानुसार केली जाईल, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सध्याचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईनंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी विनायक कोले, जाणंबा कांबळे, पांडुरंग वांद्रे, संदीप पाटील, प्रताप पाटील, कल्लाप्पा वांद्रे, अजित चंद्रकांत कुंभार, संभाजी आडाव, उत्तम मुळीक, विवेक पाटील, परशराम आडाव, लक्ष्मण बागिलगेकर, बाळू सुर्वे, रामदास पाटील, रामा मनवाडकर, लक्ष्मण मनवाडकर, सुधीर जाधव, शिवाजी जाधव, वसंत वांद्रे, अभि व्हन्याळकर, महेश कोरी, नवनाथ वांद्रे, सुनील गुरव, चेतन वांद्रे, पराग भोसले, प्रतीक सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



No comments:
Post a Comment