चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील होनहाळ ओढ्यावर बांधण्यात आलेला जंगमहट्टी मध्यम प्रकल्प आज बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून ओव्हर फ्लो झालेले पाणी सांडव्यातून ताम्रपर्णी नदीपात्रात येणार आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याचा संभव असल्याने नदीकाठच्या लोकांनी सावधानता व सतर्कता बाळगावी असा इशारा कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्यावतीने देण्यात आला आहे.
तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पांपैकी घटप्रभा नदीवरील फाटकवाडी प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर ताम्रपर्णी नदीवरील झांबरे प्रकल्प जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरले आहेत. याशिवाय कृष्णा खोरे विकास योजनेतून बांधण्यात आलेले काही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून काही भरण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासून अधिकच जोर पकडला आहे. परिणामी लघुपाटबंधारे तलावांपैकी बरेच प्रकल्प येत्या एक-दोन दिवसात भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृष्णा खोरे योजनेतील बहुतांशी प्रकल्प हे ताम्रपर्णी नदीच्या पाणलोट क्षेत्रात असल्यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो होताच पूर परिस्थितीचा संभव व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment