चंदगड / प्रतिनिधी
चालू वर्षात काजू पिकाला मोहोर अत्यल्प प्रमाणात येणे तसेच आलेला मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने अनेक भागांत काजू उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने काजू पिकाच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचा निर्णय घेतला असून, काजू बागधारक शेतकऱ्यांनी सोमवारपर्यंत आपले अर्ज संबंधित ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत पंच यांच्या संयुक्त समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात येणार आहे.
अर्जासोबत नमुना फॉर्म, चालू महिन्यातील सातबारा व आठ-अ उतारा, सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, आधार कार्ड, स्वयंघोषणपत्र, फार्मर आयडी क्रमांकाची प्रत तसेच महाविस्तार AI ॲपवर खातेदार शेतकऱ्याची नोंदणी केल्याचा स्क्रीनशॉट प्रिंट जोडणे आवश्यक आहे. एका अर्जासोबत एकापेक्षा अधिक गटांचे कागदपत्रे जोडता येणार आहेत.
विशेष म्हणजे, महाविस्तार AI ॲपवर खातेदार शेतकऱ्याची नोंदणी करणे बंधनकारक असून, अग्रिस्टॅक क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंदणी करता येईल. त्याची प्रिंट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती पेनाने लिहून सर्व झेरॉक्स प्रती शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, असे संबंधित प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच पंचनामा फॉर्ममध्ये शेतकऱ्यांनी फक्त आपले नाव व स्वाक्षरी करावी. त्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती भरू नये, अन्यथा संबंधित अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment