![]() |
| किल्ले पारगड येथील गुंजन तलाव चे पाणी आणताना विठ्ठल शिंदे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
क्रूर, कपटी औरंगजेब बादशहाच्या नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर आपली सुटका करून घेतली. जागतिक इतिहासात ही अविस्मरणीय घटना म्हणून नोंद झाली. ही घटना घडली १७ ऑगस्ट १६६६ रोजी. या घटनेच्या स्मृती पित्यर्थ आग्रा किल्ल्यावर 'शिव चातुर्य दिन' साजरा केला जातो. या निमित्य यंदा आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास स्वराज्यातील विविध ऐतिहासिक गड किल्ल्यांवरून संकलीत केलेल्या पाण्याने 'जलाभिषेक' करण्यात येणार आहे.
![]() |
| राजहंस गड किल्ल्यावरून पाणी आणताना राज तरळेकर |
चंदगड, बेळगाव परिसरातील पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड, महिपाळगड, सामानगड, वल्लभगड, राजहंसगड व कोकणातील किल्ल्यांवरुन आणलेले हे जल चंदगड व बेळगाव सीमा भागातील पत्रकार व शिवभक्त आग्रा येथे घेऊन जाणार आहेत. त्या अनुषंगाने किल्ले पारगड येथील मूळ रहिवाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज, गडावरील गिरीदुर्ग हॉटेल चे मालक विठ्ठल राघोबा शिंदे यांनी पारगड वरील गुंजन तलावाचे पाणी पत्रकार संघाकडे सुपूर्द केले. तर बेळगाव- येळ्ळूर नजीकच्या राजहंसगडावरील पवित्र जल वडगाव - बेळगाव येथील शिवभक्त व जान्हवी टुरिझम बेळगावचे मालक राज तरळेकर यांनी संकलित करून पत्रकार संघाकडे सुपूर्द केले. तर गोव्यातील वाळवंटी नदी काठावरील साखळी किल्ल्यावरील पाणी शिवभक्त राजाराम शिवाजी पाटील, पद्माकर वाळुंज व अमित दळवी या शिवभक्तांनी चंदगड पत्रकार संघाकडे पोहोच केले आहे. या सर्व शिवभक्तांचे पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
उर्वरित चंदगड तालुक्यातील गंधर्वगड, महिपाळगड व कलानिधीगड तसेच संकेश्वर नजीकच्या वल्लभगडावरील पाणी येत्या आठ दिवसात संकलित करणार असल्याची माहिती पत्रकार व जिल्हा डिजिटल मीडिया कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्कालीन सरसेनापती पिलाजी गोळे यांचे तेरावे वंशज मारुती उर्फ आबा गोळे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गरुड झेप मोहिमेंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या सात वर्षापासून आग्रा येथे सुरू आहे. याशिवाय गरुडझेप मोहीम अंतर्गत छ. राजे ज्या मार्गाने आग्रा येथून राजगडावर परतले त्याच मार्गाने सुमारे १३०० किलोमीटर अंतराची पैदल मोहीम सुरू करण्यात आली आहे.
विविध गडावरील गडावरून आणलेले हे पवित्र जल चंदगड तालुक्यातील पत्रकार श्रीकांत पाटील, संपत पाटील, चेतन शेरेगार, दीपक गावडे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर पाटील, राजाराम पाटील आदी शिवभक्त १३ ऑगस्ट रोजी आग्रा येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज वरून १६ व १७ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. अशी माहिती सी एल न्यूजचे संपादक संपत पाटील यांनी दिली.
राजहंस गड किल्ल्यावरून पाणी आणताना राज तरळेकर


No comments:
Post a Comment