चंदगड / सी एल वृत्तसेवा
आषाढी एकादशीनिमित्त श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे येथे विद्यार्थ्यांची भव्य दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. या दिंडीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली.
या दिंडीचा शुभारंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक यू. एल. पवार यांनी हरिनामाचा गजर करून केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
दिंडीदरम्यान टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी अखंड हरिनामाचा गजर केला. दिंडीसोबत आकर्षक पालखीही होती. या पालखीत भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विद्यालयातून प्रारंभ झालेली ही दिंडी गावातील श्री भावेश्वरी मंदिरापर्यंत मोठ्या भक्तिभावाने नेण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक डी. जी. पाटील, सौ. एस. आर. कोरवी, एम. पी. नाईक, गोरख पतवे तसेच हणमंत गावडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व रुजविण्यास मोठी मदत झाली. ग्रामस्थांनीही दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.



No comments:
Post a Comment