बागिलगे प्राथमिक शाळेच्या वारकरी दिंडीने ग्रामस्थांना दिली पंढरपूर आषाढी वारीची अनुभूती - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2026

बागिलगे प्राथमिक शाळेच्या वारकरी दिंडीने ग्रामस्थांना दिली पंढरपूर आषाढी वारीची अनुभूती

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   आषाढी एकादशीनिमित्त बागिलगे (ता.चंदगड) शाळेच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात शालेय कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी भगवी पताका उंचावून केली. दिंडीत बालचमू विठ्ठल-रुक्मिणी, मुक्ताई, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, निवृत्ती, सोपानदेव अशा विविध वेशभुषेत सहभागी झाले होते.

   ज्ञानोबा माऊली-तुकाराम चा गजर करत दिंडी गांवातील प्रत्येक गल्लीतील आबालवृद्धांचे लक्ष वेधून घेत होती. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी आषाढी एकादशी निमित्त दिंडीत साकारलेला बालचमूंचा उत्साह वेशभुषा, संतमाऊलींचा जयघोष सर्वांना कांहीकाळ पंढरपूरच्या वारीत सहभागी झाल्याचा आनंद देवून गेला. 

 यावेळी ह.भ.प. गावडू पाटील व संजय पाटील यांनी आपल्या भजन गायनाने दिंडीतील भक्ती भाव वाढविला. ग्रामपंचायत आवारात दिंडीचे स्वागत व खाऊवाटप सरपंच नरसू पाटील, ग्रामविकास अधिकारी रविंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी संदिप पाटील, दिलीप पाटील व इतर उपस्थित मान्यवर यांनी केले. रवळनाथ मंदिर येथे दिंडीचे स्वागत डॉ.जगदीश पाटील यांनी केले. येथे आरती, भजन व पसायदानाने दिंडीची सांगता झाली. दिंडी यशस्वीतेसाठी मुख्याद्यापक परशराम यरोळकर, शिक्षक संजय पाटील, बाबुराव वरपे, अनिल शिवणगेकर, जयश्री पाटील, प्रियांका शिवणगेकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment