कोवाड / सी.एल. वृत्तसेवा
ओलम शुगर्सचे बिझनेस हेड श्री कन्नन आणि केन हेड सुधीर पाटील यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांना भेट देऊन ऊस पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ऊस पिकाची सद्यस्थिती, मागील हंगामाच्या तुलनेतील वाढ तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात कुदणूर, कोवाड, किणी, तुर्केवाडी, तारेवाडी, बेलेभाट, सातवणे, तेऊरवाडी आदी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्री कन्नन यांनी सांगितले की, कार्यक्षेत्रातील बहुतांश शेती लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागलेली असून अनेक शेतकरी स्वतःच्या पाण्याच्या स्रोताऐवजी इतरांच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे ऊस शेतीच्या विकासावर मर्यादा येत असून समूह शेती (क्लस्टर फार्मिंग) ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, लहान शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ऊस लागवड केल्यास पूर्व मशागत, बेणे व रोप लागवड, ड्रोनद्वारे पीक संरक्षण फवारणी, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण तसेच मशिनद्वारे ऊस तोडणी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक सुलभ होईल. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळेल. या उपक्रमासाठी ओलम शुगर्स शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
केन हेड श्री सुधीर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत, त्या सोडविण्यासाठी कारखान्याच्या वतीने विविध शेतकरी हिताच्या योजना सध्या राबविल्या जात असून आगामी काळात आणखी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्याकडून सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणारे ऊस बेणे, रोपे, खते, पीक संरक्षणासाठी औषधे, प्रकाश सापळे, मळी तसेच ड्रोन फवारणी यांसारख्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्यात कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री नामदेव पाटील, श्री रणजीत सरदेसाई, सर्व केन ऑफिसर्स, फील्ड ऑफिसर्स तसेच कार्यक्षेत्रातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यामध्ये तारेवाडी येथील अजित तुरटी, युवराज पाटील, संदीप पाटील, उत्तम पाटील, तानाजी कुराडे, भारत शिखरे, राजाराम देसाई, सयाजी तुपुरवाडकर; डोनेवाडी येथील परशुराम नाईक, रामचंद्र नाईक, जयवंत नाईक; हडलगे येथील शिवाजी पाटील, अशोक तेऊरवाडकर; सातवणे येथील महादेव मीनाजी निवगिरे, पुंडलिक मीनाजी निवगिरे, नंदकुमार शंकर पाटील, विनायक पुंडलिक आवडण; कुदणूर येथील चंद्रकांत बाबू निर्मळकर, बापू गणपती जाधव, दशरथ भरमु कोले तसेच अडकूर येथील राहुल देसाई, मारुती घोरपडे, हणमंत देसाई, अतुल देसाई, विजय गावडे, उत्तम इंगवले आणि जयदीप देसाई यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment