कोवाड ग्रामस्थांकडून ३१ जुलै रोजी 'कोवाड बंद'ची हाक, ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2026

कोवाड ग्रामस्थांकडून ३१ जुलै रोजी 'कोवाड बंद'ची हाक, ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

 

संजय पाटील / सी. एल. वृत्तसेवा

    कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी लांबणीवर पडल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी समस्त कोवाड ग्रामस्थांनी शुक्रवार दि. ३१ जुलै २०२६ रोजी कोवाड बंद'ची हाक दिली आहे. याच दिवशी गावातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनातून जाहीर करण्यात आले आहे.

    ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोवाड ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे व निधीच्या वापराबाबत कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेळोवेळी लेखी तक्रारी व पुरावे संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, इतका कालावधी उलटूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती चंदगड, तहसीलदार चंदगड तसेच पोलीस निरीक्षक, चंदगड पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.

    सदर निवेदनावर विनायक राजेंद्र कोले, प्रतीक विजय सोनार, चंद्रकांत मारुती कुंभार, कल्लाप्पा रामजी वांद्रे, प्रताप पुंडलिक पाटील, लक्ष्मण बागीलगेकर, सुधीर शिवाजी जाधव, रामा बागीलगेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment