अध्यापक बाबुराव वर्पे यांच्याकडून बागिलगे शाळेसाठी ५ हजार किंमतीची फुलझाडे व औषधी वनस्पती - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2026

अध्यापक बाबुराव वर्पे यांच्याकडून बागिलगे शाळेसाठी ५ हजार किंमतीची फुलझाडे व औषधी वनस्पती

 

सुट्टीच्या दिवशी बालचमू व सहकाऱ्यांना घेऊन शाळा परिसरात फुलझाडे व औषधी वनस्पती लागवड करताना शिक्षक बाबुराव वर्पे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    बागिलगे (ता.चंदगड) येथील शालेय बगीच्या साठी प्राथमिक शाळेतील शिक्षक  बाबुराव वरपे यांनी ५ हजार रुपये किंमतीची सुमारे पन्नास फुलझाडे व औषधी वनस्पती भेट दिली. विविध रंगी जास्वंद, गुलाब, सुपारी व इतर शोभिवंत रोपे देवून शालेय परिसर सुशोभित करणेसाठी सहकार्य केले. 

    मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा, समृद्ध ग्राम अभियानाच्या अनुषंगाने व एक पेड मा के नाम उपक्रमाबरोबर शाळेने विविध उपक्रम राबविणेस सुरुवात केली आहे. नुकतीच शालेय इमारत रंगरंगोटी, प्रवेशद्वार स्टील  नामफलक व दर्शनी भिंत सुशोभीकरण करणेत आले आहे. शालेय परसबाग व बगिचा सुशोभिकरण साठी विविध प्रकारची फुलझाडे, श्रीवर्धन व मंगल जातीची सुपारी झाडे, औषधी वनस्पती व इतर शोभिवंत तसेच कोरफड, गवती चहा, वाळा, कोकम ,आले, अडुळसा अशा औषधी वनस्पती व झाडांची रोपे मुख्याद्यापक परशराम यरोळकर यांच्या कडे प्रदान केली. वरपे यांनी यापूर्वीही विविध फुलझाडांच्या ६० कुंड्या, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव संच, मार्गदर्शिका, स्पर्धा परीक्षा फी, विद्यार्थी स्मार्ट ओळखपत्र, क्रीडा व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर व शैक्षणिक साहित्य देवून शालेय गुणवत्ता व पटसंख्या वाढीस प्रोत्साहन दिले आहे.

    याकामी त्यांना सौ. शारदा वरपे, साहील वरपे, सायली वरपे यांचे सहकार्य तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शिक्षक संजय पाटील, अनिल शिवणगेकर, जयश्री पाटील, प्रियांका शिवणगेकर व पालकांचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment