चंदगड : सी एल वृत्तसेवा
मांडेदुर्ग (ता. चंदगड) केंद्र शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून गुरुपूजनाचा संस्कारक्षम कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती असलेली आदर, श्रद्धा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
मुख्याध्यापक वैजनाथ पाटील, पी. जे. पाटील, शिवाजी पाटील, सुभद्रा पाटील, कविता पाटील, बी. एस. कांबळे व राम कांबळे आदी शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी औक्षण करून आशीर्वाद घेतला. यावेळी गुरुजनांना भेटवस्तू अर्पण करून त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करण्यात आला.
गुरुंच्या मार्गदर्शनामुळे जीवनात मिळालेल्या प्रेरणा, संस्कार व यशाबद्दल मनोगते व्यक्त केली. गुरुंच्या ज्ञानदानामुळेच व्यक्तिमत्त्व घडते, या भावनेची जाणीव विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून केली.
या प्रसंगी गुरुजींनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, शिस्त, परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या संस्कारक्षम कार्यक्रमामुळे गुरु-शिष्यांमधील प्रेम, आदर, विश्वास आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले.

No comments:
Post a Comment