स्नेह, श्रद्धा आणि कृतज्ञतेतून विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे पाद्यपूजन, गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी जपली गुरु-शिष्य परंपरा, गुरुंचे संस्कारच घडवतात उज्ज्वल भविष्य - संजय साबळे - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2026

स्नेह, श्रद्धा आणि कृतज्ञतेतून विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे पाद्यपूजन, गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी जपली गुरु-शिष्य परंपरा, गुरुंचे संस्कारच घडवतात उज्ज्वल भविष्य - संजय साबळे

 

चंदगड / प्रतिनिधी :

        खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण, संस्कारमय आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्नेहपूर्वक पाद्यपूजन करून भारतीय गुरु-शिष्य परंपरेप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक शिक्षकांना भेटवस्तू दिली.या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. रिया मुजावर व कु. समिधा खोचरे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करणारे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

        यावेळी प्रमुख वक्ते तथा विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे यांनी गुरुपौर्णिमेचे  भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च असून, गुरुंचे संस्कारच उज्ज्वल भविष्य घडवतात .  ज्ञानाबरोबरच संस्कार, चारित्र्य आणि जीवनमूल्यांची शिकवण देणारा गुरुच समाज घडवितो, असे प्रतिपादन त्यांनी केले. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा असून तिचे जतन करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    अध्यक्षीय समारोपात प्राचार्य आर. पी. पाटील यांनी गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी आणि मूल्याधिष्ठित बनते, असे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमात उपप्राचार्य टी एस चांदेकर यांनीही गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन इयता सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांनी केले होते .

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एल. बेळगावकर यांनी केले. यावेळी जे. जी. पाटील, टी. व्ही. खंदाळे, विलास मोहनगेकर, वर्षा पाटील, वैशाली पाटील, साधना भोसले, प्रिया बुरुड, जयश्री पाटील, योगिता पाटील, सुरेखा कुंभार, ओंकार पाटील, गजानन तरवाळ, आकाश चव्हाण, रविंद्र कांबळे, प्रमोद कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या शेवटी शरद हदगल यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी केलेले शिक्षकांचे पाद्यपूजन, गुरुंबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रमुख वक्त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे गुरुपौर्णिमा सोहळा संस्मरणीय ठरला.

No comments:

Post a Comment