श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2026

श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाने केले होते. कार्यक्रमाच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारीही विद्यार्थी मंत्रिमंडळाने यशस्वीपणे पार पाडली.

    कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या वतीने सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याच प्रसंगी नव्याने निवड झालेल्या शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचे अभिनंदनही करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री सिद्धार्थ बुवा याने केले. त्यानंतर अनुजा पाटील, समीक्षा पवार, श्रेया गावडे, स्वराज गावडे, पूर्वा गावडे आणि अक्षता पाटील या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांपैकी डी. जी. पाटील तसेच सौ. एस. आर. कोरवी यांनी गुरूंचे जीवनातील स्थान आणि विद्यार्थी-गुरू नात्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एल. पवार उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना गुरुजनांचा आदर, संस्कार आणि ज्ञानाचे महत्त्व याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी ज्योती पाटील हिने प्रभावीपणे केले, तर आभार तन्मय पेडणेकर याने केले. गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment