पणजी : सी एल वृत्तसेवा
शिवछत्रपतींनी मोगल बादशहा औरंगजेब याच्या आग्रा येथील नजर कैदेतून १७ ऑगस्ट १६६६ रोजी धाडस व चातुर्याने आपली सुटका करून घेतली. या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ मागील वर्षी म्हणजेच ३५९ व्या शिव चातुर्य दिनानिमित्त ( १७ ऑगस्ट २०२५ रोजी) आग्रा येथे गोवा राज्यातील कुठ्ठाळी व साकवाळ या ग्रामीण भागातील महिला व शालेय विद्यार्थिनींच्या एकूण १०० कलाकारांच्या पथकाने 'शिवगाथा' या ऐतिहासिक नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले होते. ह्या महानाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल नाटकात सहभागी १०० कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
शांतादुर्गा मंदिर सभागृह 'कला शक्ती नृत्य संस्था, कुठ्ठाळी, दक्षिण गोवा' येथे शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता कलाशक्ती नृत्य संस्था आणि 'गरूड झेप मोहीम' यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रम प्रसंगी गोवा राज्याचे कला आणि संस्कृती, आदिवासी, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रमेश तवडकर, गोवा भाजप अध्यक्ष दामू नाईक, गोवा खादी ग्रामोद्योग महामंडळ चे अध्यक्ष व कुठ्ठाळी विधानसभा मतदार संघाचे आमदार अँटोनी वाझ, दक्षिण गोवा नगर नियोजन व विकास प्राधिकरण चे अध्यक्ष तथा संभाजीनगरचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, आग्रा येथील गरुड झेप मोहिमेचे संस्थापक अध्यक्ष मारुती उर्फ आबा गोळे, (पुणे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सांस्कृतिक गुणगौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व कलाकारांचा उत्साह वाढवावा. असे आवाहन आयोजन समिती प्रमुख सौ. सुप्रिया सावंत (अध्यक्षा, कला शक्ती नृत्य संस्था), राजाराम पाटील (गरूड झेप मोहीम गोवा प्रदेशाध्यक्ष) आदींनी केले आहे.

No comments:
Post a Comment