यशाचे पुढचे शिखर गाठण्यासाठी कष्टांची साथ सोडू नका– अॅड. एन. एस. पाटील, दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये नवागतांचे स्वागत, गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2026

यशाचे पुढचे शिखर गाठण्यासाठी कष्टांची साथ सोडू नका– अॅड. एन. एस. पाटील, दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये नवागतांचे स्वागत, गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन उत्साहात

चंदगड : प्रतिनिधी

    खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथे नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ऑडीटर अॅड. एन. एस. पाटील होते.  प्राचार्य आर. पी. पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गुणवत्तापूर्ण उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी प्रेरित केले.

    अध्यक्षीय भाषणात अॅड. एन. एस. पाटील म्हणाले, "यश मिळाले म्हणून थांबू नका, कारण यशाचे पुढचे शिखर तुमची वाट पाहत आहे. प्रत्येक यशानंतर अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवा. सातत्यपूर्ण कष्ट, जिद्द आणि चिकाटी यांच्या बळावरच जीवनात मोठे यश संपादन करता येते." त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी "संस्काराने व्यक्तिमत्त्व घडते. चांगले पेराल तर चांगले उगवेल. शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे अधिष्ठान आहे," असे सांगत विद्यार्थ्यांना आदर्श जीवनमूल्ये जोपासण्याचे आवाहन केले.

    यावेळी संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व पटवून देताना "वेळेचे नियोजन हेच यशाचे गमक आहे. ज्याने वेळेचे योग्य नियोजन केले तोच जीवनात यशस्वी होतो," असे प्रतिपादन केले.

    या प्रसंगी शालेय सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन, दहावी, बारावी आणि एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपप्राचार्य टी. एस. चांदेकर यांनी विद्यार्थी मंत्रीमंडळाचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार ए व्ही सुतार, पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर, प्रा. एस.  एम. निळकंठ, प्रा. व्ही. बी. गावडे, प्रा. एस. ए. शेख, प्रा. व्ही. एम. बुरुड, प्रा. पी. आर. गोरल, प्रा. सौ. एम. व्ही. गावडे, प्रा. ए. एस.रेळेकर, प्रा. के. व्ही. बांदिवडेकर, अविनाश पाटील, अमित कुट्रे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर प्रा. सोनल मुसळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment