चंदगड / पणजी : सी एल वृत्तसेवा
शिवरायांचे अचूक नियोजन, धाडस, नेत्रुत्व आणि संकटसमयी मार्ग काढण्याची विलक्षण क्षमता तरुणांनी अंगीकारली पाहिजे. बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी शिवचरित्राचा अभ्यास तरुणांनी करावा. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सचिन वायगांवकर (अभियांत्रिकी कॉलेज पिलानी गोवा) यांनी केले. कलाशक्ती नृत्य संस्था संकवाळ- कुठ्ठाळी गोवा, अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत आणि गरुड झेप संस्था पुणे गोवा शाखेच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. मुरगाव गोवा येथील वसंत जोशी महाविद्यालयाच्या मैदानावर ६ मार्च रोजी संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ सुप्रिया सावंत (संस्थापक कला शक्ती नृत्य संस्था) या होत्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक 'आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम संस्था पुणे' चे गोवा राज्य प्रमुख राजाराम पाटील यांनी केले. यावेळी पुढे बोलताना प्रा. डॉ. सचिन वायगावकर यांनी राजमाता जिजाऊ यांनी बाल शिवबा वर केलेल्या संस्कारांचे महत्त्व विषद केले. शिवजन्म काळातील ऐतिहासिक, राजकीय धामधुमीची परिस्थिती, सामाजिक आणि धार्मिक संकटे यांचा आढावा घेत स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी स्पष्ट केली. वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वर मंदिरांतील शपथ, एकामागून एक किल्ले जिंकून घेणे, लाखो सैन्याच्या गराड्यात शाहिस्तेखानावर केलेला धाडसी हल्ला, अफझलखानाचा चित्तथरारक पराभव, आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून १७ ऑगस्ट १६६६ रोजी चातुर्याने करून घेतलेली सुटका या घटनांचा उल्लेख करत त्यांनी शिवरायांचे अचूक नियोजन, धाडस, नेत्रुत्व आणि संकटसमयी मार्ग काढण्याची विलक्षण क्षमता यावर प्रकाश टाकला. आजच्या डिजिटल युगातील सामाज माध्यमांच्या अतिरेकावर भाष्य केले. "शिवचरित्र हे केवळ वाचण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे " असा संदेश देत चारित्र्य संपन्न आणि सामर्थ्यवान राष्ट्र उभारणीचा संकल्प तरुणांनी करावा आवाहन प्रा. वायंगणकर यांनी शेवटी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांकवाळ व परिसरातील महिलांनी "जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय" आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लेझीमच्या तालावर, फेटे व पारंपरिक वेशभूषेत काढलेली भव्य दिव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संभाजीनगरच्या नगरसेविका सौ शमी साळकर, वसंत जोशी महाविद्यालयाच्या सह प्राध्यापिका डॉ चंपा परब, नेवरा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुपा नायडू, सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर, उद्योजक सुधीर दुबल, तुळशीदास फळदेसाई, बजरंग दलचे युवा नेते मारुती शिरगावकर, भोगमाळ गावचे कट्टर मराठी प्रेमी रामा उसपकर, विद्यानगर कल्याणकारी संघटनेच्या अध्यक्षा सौ श्वेता हजारे, सोहळा आयोजक सौ . सुप्रिया सावंत आणि राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रूमडेश्वर महिला भजनी मंडळाने स्वागतगीत, छत्रपतींची आरती, आणि पाळणा गीत सादर केले. मारुती शिरगावकर, रमाकांत बोरकर, डॉ चंपा परब, सौ शमी साळकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा चिपळूण (महाराष्ट्र) मध्ये कास्य, रौप्य व सुवर्ण पदके पटकावलेल्या २८ बाल कलाकार, श्री दत्तात्रेय सेवा धाम मंदिर आणि स्वराज्याचे धाकटे छत्रपती संभाजी महारांचा पुर्णाकृती पुतळा श्रमदानाने उभारणाऱ्या शिवप्रेमी भगीनी, विद्यानगरचे कलाकार तसेच शिवजयंती उत्सव कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या कलाकारांना छत्रपतींचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सांकवाळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड सौ अनिता थोरात यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. धेंपे महाविद्यालयाच्या प्रोफेसर सौ अपर्णा ढवळीकर यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment