जेलुगडेत शिमगोत्सव : सोंगे, पारंपारिक जागर आणि महिला दिन कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2026

जेलुगडेत शिमगोत्सव : सोंगे, पारंपारिक जागर आणि महिला दिन कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी

   

जेलुगडे येथील कार्यक्रमात गुडदाप्पाच्या भूमिकेतील कलाकार व सहकलाकार

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        जेलुगडे  (ता. चंदगड) येथील पारंपारिक शिमगोत्सव व यंदा योगायोगाने आलेल्या ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे शिमगोत्सवातील जागर, सातेरी भावई देवी नाट्य मंडळाच्यावतीने पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यक्रमांत  तरुणाईने मोठा सहभाग नोंदवला. दशरथ पाटील यांनी गुडदाप्पाचे मुख्य सोंग काढून सर्वांचे मनोरंजन केले. मराठी विद्या मंदिर जेलुगडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यात नृत्य, मनोरंजक नृत्य, फॅन्सी ड्रेस, कोळी गीते, पारंपारिक गीते व नृत्य सादर केली. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शाळा मराठी माझी, सावित्री जोतिबा नसते तर? या गाण्याने लक्ष वेधून घेतले. यावेळी झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता जिजाऊ, माता रमाईचा संसार यांच्या विषयावरील लोकप्रबोधनपर एकपात्री प्रयोग सादरीकरण करून पुर्वा गावडे, भक्ती गावडे, पुर्वा कांबळे, परीता गावडे, संचिता चव्हाण, खुशी गावडे या चिमुकल्यांनी बक्षीसे पटकावली. या कार्यक्रमासाठी महेश नामदेव कांबळे, श्रद्धा पाटील, गौरी कांबळे, सानिका गावडे, पल्लवी गावडे यांनी परिश्रम घेतले. श्री सातेरी भावई देवी नाट्य मंडळाच्या वतीने सहभागी कलावंतांचा गौरव करण्यात आला. दशरथ पाटील आणि जोतिबा गावडे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत अनेक विनोदी उखाने, नकला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

No comments:

Post a Comment