आंबोली महादेवगड पॉईंट येथे दरीत पडलेल्या पर्यटकाचा मृतदेह १९ तासांच्या रेस्क्यूनंतर बाहेर - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2026

आंबोली महादेवगड पॉईंट येथे दरीत पडलेल्या पर्यटकाचा मृतदेह १९ तासांच्या रेस्क्यूनंतर बाहेर

डॉ. आयुब सय्यद

आंबोली / सी एल वृतसेवा 

आंबोली येथील महादेवगड पॉईंट परिसरात सुमारे ४०० फूट खोल दरीत पडलेले निपाणी येथील डॉ. आयुब सय्यद या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता घडलेल्या या दुर्घटनेनंतर सह्याद्री अॅडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीम, पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्तपणे रेस्क्यू मोहीम राबवली.

बुधवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या रेस्क्यू मोहिमेत राकेश अस्मृसकर आणि लॉरेन्स अल्मेडा यांनी दोरीच्या सहाय्याने खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचण्याचे धाडस केले. त्यानंतर वायर रोपच्या मदतीने मृतदेह सुरक्षितपणे वर आणण्यात आला. सुमारे साडेपाच तास चाललेल्या या मोहिमेनंतर दुपारी १२ वाजता रेस्क्यू पूर्ण करण्यात आला.

घटनास्थळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस कर्मचारी, मृत पर्यटकाचे नातेवाईक, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संजय यादव, ग्राम महसूल अधिकारी नंदकुमार ढेरे, कोतवाल लाडू गावडे तसेच वैद्यकीय पथक व १०८ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.

या धाडसी मोहिमेत सह्याद्री अॅडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीमचे बाबल अल्मेडा, आनंद गावडे, सागर ढोकरे, राकेश अस्मृसकर, मायकल डिसोजा, लॉरेन्स अल्मेडा, फास्कू देसा, उत्तम नार्वेकर, प्रथमेश गावडे, राजू राऊळ, नारायण चव्हाण, संतोष पालेकर, विशाल बांदेकर, गुरु सावंत, मनीष नार्वेकर, अजित नार्वेकर, हेमंत नार्वेकर, झुझे डिसोजा, सुजीत नायर, अमरेश गावडे, दशरथ कदम, दीपक नाटलेकर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, अभिजीत नार्वेकर, संतान अल्मेडा यांच्यासह पोलीस हवालदार संतोष गलोले, लक्ष्मण काळे, रामदास जाधव व सचिन चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले.

विशेषतः मायकल डिसोजा, लॉरेन्स अल्मेडा, संतान अल्मेडा, उत्तम नार्वेकर, अजित नार्वेकर, राजू राऊळ, नारायण चव्हाण, मनीष नार्वेकर, विशाल बांदेकर, प्रथमेश गावडे, राकेश अस्मृसकर आणि शुभम कळसूलकर यांनी खोल दरीत उतरून अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत वायर रोपच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे धाडसी कार्य केले. रेस्क्यू टीमच्या या साहसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment