कालकुंद्री येथे मैदान सपाटीकरण, विलास भावकू पाटील यांच्या कडून आश्वासनाची पूर्तता - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2026

कालकुंद्री येथे मैदान सपाटीकरण, विलास भावकू पाटील यांच्या कडून आश्वासनाची पूर्तता

कालकुंद्री येथील छ. शिवाजी महाराज क्रीडांगणाचे सपाटीकरण करण्यासाठी दगडी खडक मशीनने फोडण्यात आला या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    कालकुंद्री (ता. चंदगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील दगडी खडक फोडून मैदान सपाटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या व महिला बालकल्याण समिती सभापती सौ विद्या विलास पाटील यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील हे कालकुंद्री येथील अखंड नाम सप्ताह प्रसंगी आले असता ग्रामस्थ व तरुण मंडळाने त्यांच्याकडे क्रीडांगणावर अडथळा निर्माण करत असलेला दगडी फड्याचा उंचवटा फोडून मैदान सपाट करून देण्याची मागणी केली होती. यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता विलास पाटील यांनी या कामाच्या निमित्ताने करून दिली. याबद्दल ग्रामस्थ व तरुण वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

एक्सकॅव्हेटर हायड्रॉलिक रॉक ब्रेकर या मोठ्या पोकलेन यंत्राने एकदम कठीण असलेला दगड फोडण्यात आला. परिणामी क्रीडांगणाचा आकार वाढण्यास मदत झाली आहे. सपाटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी केडीसीसी बँकेचे माजी शाखाधिकारी शिवाजी कोकितकर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील, जे एस पाटील, ईश्वर वरपे, तुकाराम पाटील, शिवाजी जाधव, शरद जोशी, शिवाजी नाईक, जावेद मोमीन, गजानन जोशी दयानंद जोशी, भाऊराव पाटील, अजित पाटील आदींसह कलमेश्वर क्रीडा मंडळ चे सदस्य व खेळाडू उपस्थित होते. 

     कामाच्या शुभारंभ प्रसंगी विविध वक्त्यांनी विलास पाटील यांच्या अश्वासनपूर्ती व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. माजी सरपंच विनायक कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment