![]() |
| मेघा इंजीनियरिंग एमआयडीसी हलकर्णी चे मॅनेजर सुबराव पाटील व स्टाफ कडून संगणक व दूरदर्शन संच स्वीकारताना मुख्याध्यापक कोकितकर, अध्यापिका सीमा पाटील आदी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील एमआयडीसी मध्ये कार्यरत असलेल्या मेघा इंजीनियरिंग कंपनी मार्फत सामाजिक बांधिलकीतून परिसरातील अनेक शासकीय शाळा, संस्थांना नेहमी मदतीचा हात पुढे केला जातो. या कंपनीकडून नुकतेच चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी विद्या मंदिर करेकुंडी शाळेस दोन संगणक व एलईडी टीव्ही देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला.
बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीचे मॅनेजर सुबराव पाटील यांनी अकाऊंटंट सौ पूनम गुरव, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट श्रद्धा देवण व स्टाफसह करेकुंडी शाळेला भेट देऊन वरील उपकरणे प्रदान केली. याचा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चितच उपयोग होणार आहे. सुबराव पाटील यांच्याकडून वरील उपकरणे शाळेचे मुख्याध्यापक सोनाप्पा कोकितकर यांनी स्वीकारली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक कोकितकर यांनी मेघा कंपनीच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक करून तालुक्यातील विविध शाळांच्या समस्या सोडविण्यात मेघा कंपनीचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. दिलेल्या उपकरणांचा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी पुरेपूर वापर केला जाईल अशी ग्वाही देऊन विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने कंपनीचे ऋण व्यक्त केले. यावेळी मॅनेजर सुबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मेघा कंपनीचे कार्य व राबवत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सूर्याजी देवण आदींसह विद्यार्थी शिक्षक यांची उपस्थिती होती. अध्यापिका सौ सीमा श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment