चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नुकतीच परेड घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या गुन्हेगारांना सज्जड दम देण्यात आला असून, सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंदगडचे नूतन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिला.
चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार यांसह अन्य अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. हे अवैध धंदे मुळापासून नेस्तनाबूत करण्यासाठी प्रभावी कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच चंदगड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हजगोळी येथे घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी चंदगड तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, माजी सैनिक तसेच पोलीस मित्रांची मदत घेण्यात येणार आहे. पोलीस मित्रांची संख्या वाढवून त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या कामात सहभागी करून घेतले जाणार आहे.
तालुक्यातील दक्ष व जागरूक नागरिक हे पोलिसांचे कान, नाक आणि डोळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी परिसरातील संशयास्पद हालचाली, अवैध धंदे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले.
चंदगड तालुक्यात आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, या कामात शंभर टक्के योगदान देण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सी. एल. न्युज प्रतिनिधीशी बोलताना दिले.

No comments:
Post a Comment