शाहीर नामदेवराव निकम यांना राज्यस्तरीय ‘शाहिरी भूषण’ पुरस्कार, उत्तूर येथे भव्य श्रावणी सांस्कृतिक लोककला महोत्सव; जिल्ह्यातील ५०० हून अधिक कलावंतांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2026

शाहीर नामदेवराव निकम यांना राज्यस्तरीय ‘शाहिरी भूषण’ पुरस्कार, उत्तूर येथे भव्य श्रावणी सांस्कृतिक लोककला महोत्सव; जिल्ह्यातील ५०० हून अधिक कलावंतांचा सहभाग

 


उत्तूर / सी. एल. वृत्तसेवा

    विंझणे (ता. चंदगड) येथील सुप्रसिद्ध शाहीर नामदेवराव निकम यांना त्यांच्या प्रदीर्घ शाहिरी कलेतील योगदानाबद्दल ‘शाहिरी भूषण’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघ, आजरा तालुका शाखेच्या वतीने उत्तूर येथे आयोजित भव्य श्रावणी सांस्कृतिक विविध लोककला महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा वयोवृद्ध मानधन समिती सदस्य विलासराव पाटील बेलवले, उत्तूर येथील अखिल भारतीय शांत संप्रदाय राजाराम महाराज मठाचे अधिपती गजानन महाराज आणि राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वयोवृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य राजाराम कोपटकर यांच्या हस्ते शाहीर निकम यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित उद्योजक शिवलिंग सने होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती आजराचे वरिष्ठ सहाय्यक निलेश मिश्राप उपस्थित होते.

    शाहीर नामदेवराव निकम हे गेल्या ३४ वर्षांपासून शाहिरी कलेची अखंड सेवा करीत आहेत. त्यांच्या शाहिरीचे कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन तसेच विविध खासगी वाहिन्यांवर प्रसारित झाले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या शाहिरीच्या अनेक ऑडिओ कॅसेट्सही प्रसिद्ध झाल्या आहेत.

    आजवर त्यांनी सात हजारांहून अधिक शाहिरी कार्यक्रम सादर करण्याचा उल्लेखनीय टप्पा पूर्ण केला आहे. दूरदर्शनवरील ‘शाहिरी ललकारी’ आणि ‘गर्जा शाहिरी लोककला’ या मालिकांमध्येही त्यांच्या कार्यक्रमांचा समावेश झाला होता. शाहिरी कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि लोककलेची परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

    उत्तूर येथील महोत्सवात शाहीर निकम यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत शाहीर आनंदा पाटील (धामोड), परशुराम कांबळे (लोटेवाडी), राम कुणकेकर (मुगळी), मारुती तोडकर (माध्याळ), शाहीर शकुंतला बिरंबोळे (होण्याळी), रामदास सातपुते (लोटेवाडी), शाहीर विनायक हाळवणकर (धामणे), मारुती केसरकर, मारुती पाटोळे (महागाव) तसेच विठुमाऊली भजनी मंडळ (राजगोळी खुर्द), भजनी मंडळ (तळाशी), भजनी मंडळ (नूल) आदी कलावंतांनी विविध लोककला सादर केल्या.

    या महोत्सवात राधानगरी, भुदरगड, गारगोटी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा आणि कागल परिसरातील पाचशेहून अधिक कलावंतांनी सहभाग घेत विविध लोककला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे आयोजन तसेच शेवटी आभार प्रदर्शन राजाराम कोपटकर यांनी केले.

No comments:

Post a Comment