![]() |
| चंदगड : पोलीसांच्याकडून रुट मार्च दरम्यान प्रात्यक्षिक दाखविताना. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंदगड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने चंदगड पोलिसांकडून बुधवारी (दि. ९) सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला. पोलीस दलाची सज्जता आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे कार्यवाही करण्याची क्षमता यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
चंदगड पोलीस ठाण्यापासून रूट मार्चला सुरुवात झाली. यामध्ये गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, मुख्यालयाकडील २५ आरसीपी पथक, चंदगड पोलीस ठाण्याचे ३० पोलीस अंमलदार, १० होमगार्ड तसेच माडखोलकर महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय ३ पोलीस वाहने, १ रुग्णवाहिका व १ अग्निशमन वाहन आपत्कालीन व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते. रूट मार्च दरम्यान संभाजी चौक येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास जमाव नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर मुख्य बाजारपेठ, कैलास कॉर्नर, रवळनाथ मंदिरामागील मैदानी परिसर या मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला.रवळनाथ मंदिरामागील परिसरात दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसगन व ग्रेनेडचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची तसेच दलाची सज्जता नागरिकांसमोर प्रदर्शित करण्यात आली.
त्यानंतर मदार मशीद मार्गे रूट मार्च पुन्हा चंदगड पोलीस ठाणे परिसरात परतला. रूट मार्चदरम्यान शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी, वाहतूक नियंत्रण, जमाव नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद याबाबत पूर्वतयारी करण्यात आली.
आगामी गणेशोत्सव कालावधीत शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस दलाने आवश्यक नियोजन केले असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नूतन पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे.

.jpeg)

.jpeg)
No comments:
Post a Comment