चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सडेगुडवळे गावच्या हद्दीत बेळगाव–वेंगुर्ला मुख्य मार्गालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. चंदगड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्यापूर्वी सडेगुडवळे गावच्या हद्दीत बेळगाव–वेंगुर्ला मुख्य मार्गापासून खडी क्रशरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मृतदेहाच्या डाव्या हातात पांढऱ्या धातूचे ब्रेसलेट असून अनामिका बोटात अंगठी असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या, कुजलेल्या अवस्थेत असून प्राण्यांनी कुरतडल्याचेही आढळून आले.
याप्रकरणी पोलिस पाटील यांनी दिलेल्या वर्दीवरून चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
मृत महिलेची ओळख पटविण्याचे तसेच या घटनेमागील आरोपीचा शोध घेण्याचे काम चंदगड पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौगुले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

No comments:
Post a Comment