तुर्केवाडी : सी एल वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे नवरात्रोत्सव, दसरा व दुर्गादौड ची उत्साही आणि भक्तीमय वातावरणात सांगता झाली. पारंपरिक वेशभूषा आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सजीव देखाव्यांनी संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. या उत्सवादरम्यान गावातील काही गल्ल्यांचा विशेष नामकरण सोहळाही संपन्न झाला; यामध्ये ‘वीर तानाजी गल्ली’ व ‘छत्रपती संभाजी गल्ली’ असे नामकरण करण्यात आले.
या महोत्सवात लक्ष्मी गल्ली, चव्हाट गल्ली, मारुती गल्ली, गणपती गल्ली, आंबेडकर गल्ली, रामघाट गल्ली, वीर तानाजी गल्ली व छत्रपती संभाजी गल्ली आदी गल्ल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सजीव देखाव्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गल्ल्यांनी अप्रतिम कलाविष्कार सादर केले. यात विजेते अनुक्रमे गणपती गल्ली, नरवीर तानाजी गल्ली, चव्हाट गल्ली आदींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून हलकर्णी प्राथमिक शाळेचे शिक्षक गोविंद लक्ष्मण चांदेकर, जनता विद्यालय तुर्केवाडीचे कलाशिक्षक एस. डी. गावडे, हलकर्णी महाविद्यालयाचे प्रा. सुरज मुकुंद सुतार यांनी काम पाहिले.दुर्गामाता मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सौ. संजीवनी ओऊळकर, उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम गावडे, तालुका संघाचे संचालक जनबा भरमाना चौगुले, माजी सरपंच रुद्रप्पा तेली, राजाराम फर्जंद यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments:
Post a Comment