कोल्हापूर : प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी निगडित असलेला आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. कोल्हापूर येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमात हेरे सरंजाम लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या सातबाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) सहभागी झाले. हेरे सरंजाम प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल लाभार्थींच्या वतीने महसूलमंत्री बावनकुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या जमिनीच्या हक्काचा सातबारा प्रत्यक्ष हातात मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. हेरे सरंजामचा प्रश्न हा केवळ जमिनीच्या कागदपत्रांचा विषय नसून हजारो कुटुंबांच्या हक्काचा, भविष्याचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न होता. या निर्णयामुळे नागरिकांना जमिनीशी संबंधित व्यवहार, विविध शासकीय कामे आणि कर्जप्रकरणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली; हक्काची जमीन आणि हक्काचा सातबारा मिळाल्याने हजारो कुटुंबांना न्याय मिळाला, अशी भावना यावेळी लाभार्थींनी व्यक्त केली.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने राज्य सरकार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी आमदार अशोकराव माने, राहुल आवाडे, अमल महाडिक, नाथाजी पाटील, जिल्हाधिकारी विजय राठोड, महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी, हेरे सरंजाम लाभधारक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment