चंदगड : श्रीकांत पाटील/ सी एल वृत्तसेवा
माडवळे (ता. चंदगड) येथे घरात शिरलेल्या जहाल विषारी नागाला सर्पमित्र व वनविभागाकडून सुरक्षित जीवदान मिळाल्याची घटना काल दुपार नंतर घडली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे गरोदर महिलेसह कुटुंबियांची भीतीतून सुटका झाली.
तालुक्यातील जंगल परिसरात वसलेल्या माडवळे येथील प्रेमा कांबळे यांच्या घरात शिरलेल्या विषारी नागाला ढोलगरवाडी येथील सर्पमित्र संदीप बाबुराव टक्केकर आणि वनविभागाच्या पथकाने दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे रेस्क्यू केले. घरात गरोदर महिला असल्याने कुटुंबामध्ये प्रचंड भीतीचे सावट पसरले होते. मात्र नागाला सुखरूप पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या थरारक घटनेची माहिती अशी : पहिल्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास कांबळे यांच्या पत्र्याच्या घरातील छताच्या पाईपमध्ये विषारी नाग दिसून आला. घरात गरोदर महिला असल्यामुळे संपूर्ण कुटुंबात अत्यंत भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच सर्पमित्र संदीप टक्केकर, वनविभागाचे घुल्ले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पत्र्याचे छत, नागाचे पाईपमधील अवघड स्थान आणि अंधार पडल्यामुळे पहिल्या दिवशी रेस्क्यू करणे कठीण झाले. परिणामी रेस्क्यू कार्य थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज २३ ऑगस्ट रोजी दुपारी पुन्हा पत्र्याखाली संबंधित महिलेच्या दृष्टीस नाग पडताच तिच्यासह घरातील सदस्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी तात्काळ सर्पमित्र संदीप यांच्याशी संपर्क साधला. संदीप व वन विभागाच्या पथकाने कोणतीही हयगय न करता अत्यंत कौशल्याने त्या विषारी नागाला सुरक्षितपणे पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे घरातील सदस्यांचा जीव भांड्यात पडला. माडवळे गाव परिसरातील परिसरात या घटनेनंतर सर्पमित्र संदीप टक्केकर व वन विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
या संपूर्ण बचाव मोहिमेत चंदगड चे नायब तहसीलदार प्रकाश जोशीलकर तसेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर शीतल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भीतीचे सावट दूर करून कुटुंबाला सुरक्षित केल्याबद्दल कांबळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्पमित्र आणि प्रशासनाचे आभार मानले.
'ढोलगरवाडी स्नेक पार्कला शासकीय मान्यतेची मागणी'-
या यशस्वी बचावकार्यानंतर सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी ढोलगरवाडी स्नेक पार्कच्या मान्यतेचा प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडला. स्नेक पार्कचे संस्थापक, सत्यशोधक व आद्य सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी स्थापन केलेल्या ढोलगरवाडी स्नेक पार्कला 'सेंट्रल झू अथॉरिटी, दिल्ली' व 'महाराष्ट्र झू अथॉरिटी, नागपूर' लादलेल्या जाचक अटी रद्द करून त्यांच्याकडून अधिकृत शासकीय मान्यता मिळावी. अशी मागणी त्यांनी केली. ढोलगरवाडी सर्प शाळेतून आजवर हजारो सर्पमित्र घडले आहेत. ते देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यात सर्प प्रबोधनाचे कार्य करत आहेत. तर ढोलगरवाडी शाळा व गावातील सर्पमित्र कोणतेही शासकीय किंवा अन्य प्रकारचे मानधन मेहनताना नसतानाही वन्यजीव रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत. या कार्याला शासकीय पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment