कोल्हापूर येथे सहाय्यक आयुक्त (जीएसटी) म्हणून पदोन्नतीबद्दल गोपाळ पाटील यांचा बागिलगे येथे सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2026

कोल्हापूर येथे सहाय्यक आयुक्त (जीएसटी) म्हणून पदोन्नतीबद्दल गोपाळ पाटील यांचा बागिलगे येथे सत्कार

 


चंदगड / प्रतिनिधी : 

    बागिलगे (ता. चंदगड) येथील सुपुत्र तथा राज्यकर अधिकारी गोपाळ पाटील यांची पुणे येथून पदोन्नतीने कोल्हापूर येथे सहाय्यक आयुक्त (जीएसटी) म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

    चंदगड पंचायत समितीचे सभापती विलासराव नाईक, सरपंच नरसू पाटील व उपसरपंच राजू सुतार यांच्या हस्ते गोपाळ पाटील यांचा शाल, श्रीफळ, फेटा, साडी, भेटवस्तू व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गावातील विविध संस्था व नागरिकांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नरसू पाटील होते. प्रास्ताविक माजी प्राचार्य एस. आर. पाटील यांनी केले.

    माजी प्राचार्य एस. बी. पाटील म्हणाले, अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर गोपाळ पाटील यांनी सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली, हा बागिलगे गावासाठी अभिमानाचा व सुवर्णक्षण आहे. अधिकारी म्हणून काम करतानाच त्यांनी गाव व पंचक्रोशीच्या विकासासाठी योगदान दिले. बागिलगे ते सोनारवाडी रस्ता स्वखर्चाने करून देण्याबरोबरच प्राथमिक शाळा, शिवमूर्ती, अंतर्गत रस्ते यांसह विविध विकासकामांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

    सत्काराला उत्तर देताना गोपाळ पाटील म्हणाले, आई-वडिलांचे कष्ट व संस्कार यांचे कायम स्मरण ठेवून उच्च शिक्षण घेतले. परिस्थितीमुळे अल्प मानधनावर शिक्षक म्हणून काम करत असताना एमपीएससी परीक्षा देऊन राज्यकर अधिकारी झालो. ज्या कुटुंबाने व गावाने मला मोठे केले, त्यांचे ऋण सदैव मनात ठेवून आई-वडिलांची सेवा करण्याबरोबरच गावच्या विकासासाठी विविध उपक्रमांत योगदान देत राहिलो, याचे समाधान आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘माझा गाव, समृद्ध गाव’ योजनेत राज्यस्तरीय क्रमांक मिळविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

    यावेळी ग्रामविकास अधिकारी रविंद्र पाटील, प्रा. नंदकुमार पाटील, शिक्षक संघ (थोरात गट) चंदगड तालुका अध्यक्ष सदानंद पाटील व बाबुराव वरपे यांनी मनोगत व्यक्त केले. कु. सायली वरपे यांनी तयार केलेला गोपाळ पाटील यांच्या ‘बालपण ते सहाय्यक आयुक्तपद’ या जीवनप्रवासावरील व्हिडिओ उपस्थितांची दाद मिळवून गेला.

    कार्यक्रमास एस. के. पाटील, सदानंद पाटील, प्राचार्य के. जी. पाटील, प्रा. वसंत पाटील, डॉ. जगदीश पाटील, माजी सरपंच संपदा गुरव, पोलिस पाटील प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, दूध संस्था, सोसायटी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, बचत गट, शालेय समिती सदस्य, महिला मंडळ तसेच पंचक्रोशीतील शिक्षण, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. आभार प्रा. रामा पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment