उत्तुर येथे शाहीरी लोककला उत्सवाला सुरवात, शाहीर निकम यांच्या हस्ते उद्घाटन, श्रावण महिन्यातील चार शनिवार - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2026

उत्तुर येथे शाहीरी लोककला उत्सवाला सुरवात, शाहीर निकम यांच्या हस्ते उद्घाटन, श्रावण महिन्यातील चार शनिवार

  


चंदगड / प्रतिनिधी

   शाहीरी लोककलेची जोपासना व्हावी तसेच शाहीरी कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उत्तूर येथे लोक कलाकार संघ, आजरा तालुका शाखेच्या वतीने शाहीरी लोककला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील सलग चार शनिवार हा उत्सव होणार असून, जिल्ह्यातील विविध लोककलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.

    उत्सवाचे उद्घाटन चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ शाहीर नामदेवराव निकम यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन लोक कलाकार संघाचे आजरा तालुका अध्यक्ष व वयोवृद्ध कलाकार मानधन समितीचे सदस्य राजाराम कोपटकर (बहिरेवाडी) यांच्या हस्ते करण्यात आले.

    कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राजर्षी शाहू महाराज वयोवृद्ध मानधन समितीचे सदस्य विलासराव पाटील (बेलवळे बुद्रुक, ता. कागल) यांच्या मार्गदर्शनाखाली या लोककला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    उद्घाटनप्रसंगी शाहीर नामदेवराव निकम यांच्यासह शाहीर विनायक हाळवणकर (धामणे-बामणे), धोंडीराम डावरे (मासे-बेलेवाडी), नेमगोंडा अथनी (भैरेवाडी), रामदास सातपुते (लोटेवाडी-गारगोटी), परसु कांबळे (मिनचेकर), धोंडीराम जाधव (जक्कीन पेठ), सौ. शकुंतला बिरंबोळे (होन्याळी), सौ. मालुताई सुतार (चव्हाणवाडी), मारुती पाटोळे (महागाव), पांडुरंग जाधव (केळेवाडी), तानाजी बाबर (होन्याळी), शिवाजी पाटील (होन्याळी) यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शाहीर व लोककलावंतांनी विविध लोककलांचे सादरीकरण केले.

    श्रावण महिन्यातील सलग चार शनिवार हा उत्सव सुरू राहणार आहे. या काळात शाहीरी, भजन, कीर्तन, गोंधळ, भारूड, डवरी, रेणुका देवी जागर, लेझीम आदी पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पारंपरिक लोककलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले.

    यावेळी परिसरातील मान्यवर, कलावंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन महाराज पवार यांनी केले, तर मारुती दिंडे यांनी आभार मानले. उत्तूरसह परिसरातील नागरिकांनी या लोककला उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment