हत्तरगीच्या श्री हरीकाका मठात गोकुळाष्टमी उत्सवाची पर्वणी; ४ सप्टेंबरला आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा, ६० हजारांची बक्षिसे - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2026

हत्तरगीच्या श्री हरीकाका मठात गोकुळाष्टमी उत्सवाची पर्वणी; ४ सप्टेंबरला आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धा, ६० हजारांची बक्षिसे


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

हत्तरगी येथील पुरातन श्री हरीकाका गोसावी भागवत मठात गोकुळाष्टमीनिमित्त ४, ५ व ६ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून, या निमित्ताने आंतरराज्य भव्य संगीत भजन सम्राट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भजन सम्राट स्पर्धा होणार आहे. या आंतरराज्य भव्य संगीत भजन स्पर्धेत विविध ठिकाणच्या भजनी मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मठाचे पीठाधीश डॉ. आनंद गोसावी महाराज यांनी केले आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास २१ हजार १ रुपये रोख व मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ एकूण १४ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून, सहभागी संघांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी संघांना सादरीकरणासाठी १८ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. या कालावधीत किमान दोन अभंग व एक गवळण सादर करणे आवश्यक आहे. सादर करण्यात येणाऱ्या रचना संत रचित, म्हणजेच गाथेतील असणे बंधनकारक आहे. अभंगांच्या रचना मराठी व कन्नड भाषेत सादर करता येतील. इच्छुक भजनी मंडळांनी ३१ ऑगस्टपर्यंत श्री हरी मंदिर, हत्तरगी, जिल्हा बेळगाव येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

श्रीकृष्ण जयंती उत्सवानिमित्त ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता सौ. स्वरदा पटवर्धन हरिदास (सांगली) यांचा श्रीकृष्ण जन्मसोहळा व नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ सप्टेंबर रोजी पारणे, प्रवचन व भजनाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांची भक्तिसंगीत गायन सेवा होणार आहे. याशिवाय विविध सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत.

माण (ता. शाहूवाडी) येथून आनंद पायी दिंडीचे हत्तरगी येथे आगमन होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी दुपारी विविध आध्यात्मिक कार्यक्रम, गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गोकुळाष्टमी उत्सवातील सर्व कार्यक्रमांचा भाविक, संगीतप्रेमी व भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment