चंदगड : प्रतिनिधी
बदलत्या व्यावसायिक, औद्योगिक आणि आर्थिक वातावरणाचा विचार करून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान, कौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा, यासाठी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी आवश्यक बदल केले जातात. सुधारित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशासनातील आधुनिक संकल्पना, व्यवस्थापन कौशल्ये आणि बदलत्या व्यावसायिक क्षेत्रातील संधींची माहिती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन बीजभाषक डी. आर. माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एल. कदम यांनी केले.
आर. बी. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथे बी.कॉम. भाग-३, सत्र-५ या वर्गाच्या Business Administration विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय कार्यशाळेचे चार सत्रात आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. सुनील काणेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम. एम. माने होते.
यावेळी बीजभाषणातून मार्गदर्शन करताना डॉ. एन. एल. कदम यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यामध्ये निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून प्राध्यापकांना अभ्यासक्रमातील बदल समजून घेण्याबरोबरच त्याचा प्रभावीपणे अध्यापनात वापर करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लजचे प्राध्यापक डॉ. डी. पी. खेडकर तसेच आर. आय. टी. इन्स्टिट्यूट, इस्लामपूरच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिभा जगताप यांनी साधन व्यक्ती म्हणून सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. डी. पी. खेडकर यांनी Business Administration या मेजर विषयातील आदरातिथ्य व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सुधारित अभ्यासक्रमातील विविध घटक, विषयाची व्याप्ती, नवीन संकल्पना तसेच विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगण्यासाठी आवश्यक असलेल्या अध्यापन पद्धतींची माहिती दिली. बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी संबंधित उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमध्ये विषयाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. प्रतिभा जगताप यांनी व्यूहरचणात्मक मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या सुधारित अभ्यासक्रमातील विविध घटकांचे सादरीकरण करताना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनातील बदल, व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची उपयुक्तता स्पष्ट केली. तसेच अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी चर्चात्मक, उदाहरणाधारित आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. त्यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सुधारित अभ्यासक्रमाची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, त्यातील नवीन घटक समजून घेणे आणि प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक दिशा निश्चित करणे हा कार्यशाळेचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
कार्यशाळेचे उद्घाटक चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. सुनील काणेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षाभिमुख न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आणि कौशल्यविकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य एम. एम. माने यांनी सुधारित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना त्याचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापकांना बी.कॉम. भाग-३, सत्र-५ मधील Business Administration विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळाली. अभ्यासक्रमातील नवीन घटक, अध्यापनाच्या प्रभावी पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आवश्यक बाबी समजून घेण्यास कार्यशाळेचा उपयोग झाला. त्यामुळे या कार्यशाळेचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेस विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील वाणिज्य व व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी प्राध्यापकांनी साधन व्यक्तींशी संवाद साधून सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. डी. गोरल यांनी केले, सुत्रसंचलन प्रा. शोभा आरभोळे यांनी केले, तर डॉ टी. ए. कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेचे सुयोग्य नियोजन व आयोजन महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आले असून, सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. पुजा देशपाडे, प्रा. महादेव गावडे, प्रा. युवराज हेरेकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment