चंदगड / सी. एल. वृत्तसेवा :
लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लिंगायत समाजाला आठ दिवसांत न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. अवघ्या आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे.
राज्य शासनाने ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेच्या लक्षित गटामध्ये ‘हिंदू लिंगायत’ व ‘वीरशैव लिंगायत’ समाजाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे लिंगायत समाजातील युवक-युवतींना शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास तसेच विविध प्रगतीच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.
लिंगायत समाजाच्या इतर मागण्यांबाबतही राज्य सरकार सकारात्मक असून, उर्वरित मागण्यांवर लवकरच समाजहिताचा निर्णय होईल, असा विश्वास समाजाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
लिंगायत समाजाच्या न्यायासाठी शिवाभाऊंचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा सकारात्मक निर्णय यामुळे समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment