कामेवाडी येथे चार शेतकऱ्यांची ५०० फुट मोटर पंप केबल चोरट्यांकडून लंपास, शेतकऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2026

कामेवाडी येथे चार शेतकऱ्यांची ५०० फुट मोटर पंप केबल चोरट्यांकडून लंपास, शेतकऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक राज्यातील हुक्केरी तालुक्यास लागून असलेल्या कामेवाडी येथील शेतकऱ्यांच्या मोटर पंप केबल चोरीची घटना घडली. सोमवार दि. ७/९/२०२६ रोजी चोरट्यांनी तब्बल ५०० फूट पेक्षा अधिक लांबीची वायर लंपास केली. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांना पोलिसांनी आळा घालण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

  ताम्रपर्णी नदी काठ परिसरातील केरी व्हळा नावाच्या शिवारातील बसवाणी सिद्राम शिरगे (१५० फुट), राजेंद्र चुडामणी पाटील (१४० फुट), गुरुवाना यल्लाप्पा पाटील (१०० फुट), परशराम रामा पाटील (१०० फुट) यांच्या मोटर पंप च्या वायर चोरीस गेल्या. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. 

   गेल्या काही वर्षात किटवाड धरण, कालकुंद्री, कुदनूर ओढाकाठ येथे बसवलेल्या अनेक मोटर पंप च्या वायर चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यापूर्वी किटवाड धरण परत परिसरातील कुदनूर व किटवाड गावच्या शेतकऱ्यांच्या मोटर पंप ची चोरी करताना चोरांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले होते. तथापि पोलिसांनी याची योग्य प्रकारे दखल न घेतल्यामुळे चोरांना पोलिसांचा धाक कमी झाल्याचे या घटनेवरून दिसत आहे. वाढत्या केबल चोरी, घरफोडी, तांबे पितळेची भांडी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चंदगड तालुक्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नामदेव शिंदे रुजू झाले आहेत. त्यांच्याकडून शेतकरी व नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

No comments:

Post a Comment