![]() |
| संग्रहित छायाचित्र |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
ब्रिटिशकालीन भारतीय वन कायदा - १९२७ नुसार घोषित तत्कालीन मुंबई इलाख्यातील व सध्याच्या चंदगड तालुक्यातील चिंचणे - कामेवाडी राखीव जंगलक्षेत्र हे अलीकडील काळात सर्वप्रकारच्या वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान बनले आहे.
पूर्वी या जंगलक्षेत्रात राष्ट्रीय पक्षी मोर, काळवीट, हरीण, ससे यासारखे प्राणी आढळत होते. मात्र अलीकडील काळात गवे, रानगाई, रानडुक्कर, हत्ती सारखे प्राणी कळपाने रहात आहेत. अलीकडे तरस सदृश्य प्राणी आढळून आल्याने या जंगल क्षेत्राचा पूर्वेतिहास पुन्हा प्रकाशात आला आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळापासून हे जंगलक्षेत्र चंदन वृक्षाच्या व स्थानिक आदिवासी महादेव कोळी जमातीच्या उदरनिर्वाहाचे व वनौषधीचे प्रमुख केंद्र राहिले आहे. कै बसवंत लक्ष्मण पाटील (चिंचणे), कै. हुवाण्णा इराप्प्पा पाटील (कामेवाडी) हे वैदू विविध आजारावर आयुर्वेदिक औषधे देत असत. आज सुद्धा त्यांचा वारसा स्थानिक आदिवासीनी चालवल्याचे दिसून येते.
या जंगल क्षेत्रात पूर्वापार राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नती करिता ब्रिटिशांनी दि जंगलधंदे कामकरी सहकारी संघ लि. चिंचणे - कामेवाडीची स्थापना १७ जानेवारी १९४८ रोजी केली होती. याचे कामकाज नरसिंहपूर, ता. जि. बेळगाव येथून चालत असे. या संघाच्या अखत्यारीत कस्तुरबा महिला ग्रामोद्योग केंद्र उभारले होते. या संघाअंतर्गत कोळसा काढणे, कुप लावणे, डिंक, मध लाख यासारखे वनोपज गोळा करणे यासारखी कामे स्थानिक आदिवासी करत असत. हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. मुंबई इलाख्यातील ११ जंगल सोसायट्यामध्ये सर्वाधिक नफा कामावलेली संस्था म्हणून याचा उल्लेख स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भाषणात केल्याचे भीमराव गस्ती लिखित राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त " आक्रोश " कादंबरीत दिसून येते. या संघाला मुंबई इलाख्यातील तत्कालीन सरकारी एजंट व प्रमुख व्ही पी वर्दे, श्रीरंग कामत, डी एन वांद्रेकर यांनी भेटी दिल्याचे स्थानिक लोकांकडे चौकशी केल्यानंतर समजते. हा संघ अवसयानात काढण्याची प्रक्रिया १९७६ साली सुरु झाल्याचे समजते. १९९३ पर्यंत हा संघ अस्तित्वात होता.आता चौकशी केल्यानंतर हा संघ अवसायानात निघाल्याचे समजते. तथापि, जुनी ओळख टिकून रहावी या करिता हिच संस्था पुनःरुज्जीवित करण्यासाठी सध्या शासनस्तरावर प्रयत्न चालू असल्याचे प्रा बसवंत पाटील व प्रा. विठ्ठल पाटील यांनी सांगितले.
सद्यस्थितीत या जंगल क्षेत्रात लागून असलेल्या चिंचणे कामेवाडीसह तेऊरवाडी, नरगट्टे, दूंडगे आदि गावातील नागरिकांना जंगली श्वापदे, हिंस्त्र प्राणी, पशू यांच्यापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतातील पिकाचे रक्षण करण्यासाठी रात्री जागरण करावे लागत आहे. आता तरस सदृश्य प्राण्यांच्या या जंगल क्षेत्रातील वावराने स्थानिक आदिवासीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त वनविभाग करणार का ?जंगल क्षेत्राच्या जाज्वल्य इतिहासाकडे व त्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या स्थानिक आदिवासी कोळी महादेव जमातीच्या मूलभूत प्रश्नांकडे आदिवासी विकास विभाग आणि संलग्न संस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था लक्ष देईल का? या विवंचनेत स्थानिक आदिवासी गेली ४० वर्षे वाट पाहत आहेत.

No comments:
Post a Comment