संजय पाटील / कोवाड, सी. एल. वृत्तसेवा
कामेवाडी (ता. चंदगड) परिसरातील जंगलात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
कामेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल व डोंगराळ भाग असल्याने विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलालगतच्या शेतशिवारात किंवा मानवी वस्तीजवळ येण्याची शक्यता असते. त्यातच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने वनविभागाने परिसरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
वनविभागाचे डिसूझा यांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याची माहिती दिली असून, सध्या हा बिबट्या कर्नाटकातील मरनहोळ जंगल परिसरात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कर्नाटक वनविभागाकडूनही बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.
जंगल परिसरात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी शक्यतो एकट्याने जाऊ नये. विशेषतः सायंकाळनंतर व रात्रीच्या वेळी जंगल परिसरात जाणे टाळावे. शेतात काम करताना तसेच जनावरे चारण्यासाठी नेताना विशेष खबरदारी घ्यावी. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी जंगलालगतच्या भागात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्या दिसल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखून शांतपणे दूर जावे आणि तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.
दरम्यान, जंगलालगतच्या शेतांमध्ये व घरांच्या परिसरात बांधलेल्या शेळ्या, वासरे, कुत्री व इतर पाळीव जनावरांचीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. जंगलाच्या कडेला अथवा मोकळ्या जागेत जनावरे बांधणे टाळावे, जेणेकरून वन्यप्राण्यांकडून होणारा संभाव्य धोका कमी करता येईल.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि बिबट्याच्या हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment