चंदगड : सी एल वृत्तसेवा
सर्पालय आणि सर्प शाळेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे दरवर्षी नागपंचमी निमित्त होणारा सर्प प्रदर्शन व प्रबोधन कार्यक्रम झु अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या जाचक नियमावलीमुळे गेल्या काही वर्षापासून अडचणीत आला आहे. गेल्या ६८ वर्षांपासून आद्य सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांचे संवर्धन व्हावे साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. सापाबद्दलचे गैरसमज अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधनाचे कार्य सुरू केले. कै. बाबुराव टक्के कर यांच्या निधनानंतरही ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व टक्केकर यांचे अनुयायी त्यांचे कार्य विविध संकटांचा सामना करत पुढे चालवत आहेत. तथापि केंद्रीय प्राणी संग्रहालय विभाग व वन विभागाच्या अनाठाई अटींमुळे ही परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक सापाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदू राज्यांतील वन विभाग, पोलीस, आर्मी, डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक, संशोधक यांच्यासाठी अभ्यासाचे सहज उपलब्ध असलेले केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
निदान नागपंचमीच्या निमित्ताने एक दिवस का होईना प्रत्यक्ष साप दाखवून सापांच्या बाबतीतील लोकांच्या मनातील भीती, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून सापांविषयी शास्त्रीय माहिती देण्यासाठीच्या कार्याला परवानगी द्यावी. अशा आशयाचे पत्र चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नुकतेच तहसीलदार चंदगड यांना दिले आहे. विद्यार्थी, ग्रामस्थ, नागरिक यांच्या ज्ञानवर्धन व सापाबद्दलच्या जनजागृतीसाठी नागपंचमीच्या निमित्ताने प्रत्यक्ष साप दाखवून शास्त्रीय माहितीद्वारे प्रबोधन होण्याची गरज पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
देशासह परदेशातील पर्यावरण प्रेमींच्या कुतूहलाचा विषय असलेले चंदगड विधानसभा मतदारसंघातील ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सट्टूपा टक्केकर जुनियर कॉलेज येथील सर्प केंद्र टिकवण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी परिसरातील पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान येथील शेतकरी शिक्षण मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी आमदार शिवाजीराव पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण व चंदगडचे न्यायाधीश यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमीच्या दिवशी ढोलगरवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास विशेष बाब म्हणून बत्तीस शिराळा येथील कार्यक्रमाच्या धरतीवर परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment