चंदगड : सी एल वृतसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नियमित व प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान सध्याच्या ₹५० हजारांवरून किमान ₹१ लाख किंवा त्यापेक्षा अधिक करण्यात यावे, अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केली.
राजेश पाटील यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करणारा असून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये थकीत कर्जाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे या भागातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड करून आर्थिक शिस्त पाळली आहे. शासनाने अशा प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवून किमान ₹१ लाख किंवा त्यापेक्षा अधिक करावी, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.
यावेळी राजेश पाटील यांनी चंदगड तालुक्यात निर्माण झालेल्या खतांच्या तुटवड्याचाही प्रश्न कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक रासायनिक खतांचा वेळेत व पुरेसा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चंदगड तालुक्यातील खतटंचाई तातडीने दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या भेटीप्रसंगी सभापती विलास नाईक, व्हाइस चेअरमन तानाजी गडकरी, एस. एल. पाटील, अनिल सुरुतकर, एस. वाय. पाटील, विनोद पाटील तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment