उमाजीराजे आणखी १०-१५ वर्षे राहिले असते तर भारत १०० वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता..! अखलाकभाई मुजावर, कालकुंद्री येथे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2026

उमाजीराजे आणखी १०-१५ वर्षे राहिले असते तर भारत १०० वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता..! अखलाकभाई मुजावर, कालकुंद्री येथे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती उत्साहात

कालकुंद्री येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना शिवव्याख्याते अखलाखभाई मुजावर सोबत मान्यवर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक आणखी केवळ १०-१५ वर्षे इंग्रजांच्या हाती लागले नसते तर भारत देश १९४७ ऐवजी १८४७ मध्ये माझे शंभर वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता. खुद्द इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश यांने लिहून ठेवले आहे. असे गौरवोद्गार शिवव्याख्याते अखलाकभाई मुजावर यांनी काढले. ते कालकुंद्री येथे राजे उमाजी नाईक युवा मंच व महिला मंडळ आयोजित उमाजींच्या २३५ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील होते.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांसोबत क्रांतिकारक उमाजी नाईक युवा मंच चे कार्यकर्ते

   कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पा रामू नाईक व उपाध्यक्ष कल्लाप्पा नागोजी नाईक यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय पत्रकार श्रीकांत पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविक बेरड-रामोशी सेवा संघाचे राज्य सचिव सुरेश नाईक यांनी केले. 

   यावेळी पुढे बोलताना मुजावर म्हणाले मराठी शाही व पेशवाईच्या अस्ता नंतर जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध उमाजी यांनी बेरड रामोशी व इतर मावळ्यांना हाताशी धरून सशस्त्र बंड पुकारले. जुलमी सावकार, धनिक व इंग्रजांची संपत्ती लुटून ते गोरगरिबांना दान करत. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे उमाजी यांनी स्वतःच्या राज्याभिषेक करून आपल्या राज्याचा स्वतंत्र जाहीरनामा काढला होता. आपल्या सशस्त्र हल्ल्याने इंग्रजांच्या मनात धडकी भरवलेले पराक्रमी उमाजी नाईक आणखी दहा-पंधरा वर्षे इंग्रजांच्या हाती लागले नसते तर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगळाच दिसला असता.  ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवडी किल्ले पुरंदर येथे जन्मलेल्या उमाजींना फंदपितुरीने  पकडून इंग्रजांनी ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी दिले. केवळ ४३ वर्षांचे उणेपुरे आयुष्य लाभलेल्या उमाजींनी १८१६ ते १८३२ या सोळा वर्षांच्या काळात इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडले होते. अशा राजे उमाजींचा आदर्श सर्वांनी जपला पाहिजे असे प्रतिपादन अखलाक भाई मुजावर यांनी केले. 

  यावेळी एम. जे. पाटील, शास्त्रज्ञ प्रा. निलेश तरवाळ (दुंडगे), तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर कोकितकर आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी एसटी बस चालक कल्लाप्पा कृष्णा नाईक यांचा सेवा निवृत्ती बद्दल तर  नायब सुभेदार पदी पढती मिळाल्याबद्दल दौलत नाईक यांच्यासह नाईक समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

  यावेळी तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष शंकर कोले, विद्यमान उपाध्यक्ष शंकर पाटील, आजीमाजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळकृष्ण पाटील, माजी अध्यक्ष शरद जोशी, अनिल तेऊरवाडकर, माजी सरपंच विनायक कांबळे, अमोल कोले, वैजू नाईक आदींची उपस्थिती होती. 

   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परशराम नाईक, मारुती नाईक, लक्ष्मण नाईक, भरत नाईक, शिवराज नाईक, मोहन नाईक आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश नाईक यांनी केले. मंडळाचे खजिनदार लक्ष्मण शिवाजी नाईक यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment