कालकुंद्री येथील दूध संस्थेकडून उत्पादकांना विक्रमी शेकडा २६.५० टक्के नफा वाटप, काशिर्लिंग दूध संस्थेची ४७ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2026

कालकुंद्री येथील दूध संस्थेकडून उत्पादकांना विक्रमी शेकडा २६.५० टक्के नफा वाटप, काशिर्लिंग दूध संस्थेची ४७ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

कालकुंद्री येथील श्री काशिर्लिंग सहकारी दूध संस्थेच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी यांच्या सोबत सर्वाधिक दूध पुरवठा क्रमांक विजेते

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   कालकुंद्री येथील चंदगड तालुक्यातील सर्वात जुन्या 'श्री काशिर्लिंग संस्थेने दूध उत्पादक सभासदांना यंदा विक्रमी नफा वाटप करण्याची घोषणा केली. संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. ११/०९/२०२६ रोजी संस्थेच्या स्व मालकीच्या इमारतीत खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी अशोक उर्फ भागोजी तुकाराम पाटील हे होते.

    संचालक परशराम यल्लाप्पा पाटील यांनी स्वागत केले. संस्थेचे क्लार्क जयवंत कलाप्पा पाटील यांनी विषय पत्रिका व नफा तोटा पत्रक वाचन केले. सचिव तानाजी गोपाळ पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन यंदा उत्पादकांनी संस्थेला पुरवठा केलेल्या म्हैस दूधसाठी शेकडा २६.५०% व गाय दूधासाठी शेकडा २०% विक्रमी नफा संस्था देणार असल्याचे संचालक मंडळाच्या वतीने जाहीर केले.  

  यावेळी अहवाल सालात सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांचा भेटवस्तू, चषक व मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला. क्रमांक पटकावलेले शेतकरी व त्यांनी पुरवठा केलेले दूध पुढीलप्रमाणे म्हैस दुधात अनुक्रमे सौ लक्ष्मी सुबराव ओऊळकर (१०४०३ लिटर), संजय बसाप्पा पुजारी (६२२४ लिटर), जयराम बाळू बोंद्रे (५६०८ लिटर) तर गाय दुधात अनुक्रमे रामलिंग शिवाप्पा पुजारी (१६७२५ लिटर), शंकर लक्ष्मण जाधव (९३०५ लि.), व शिवाजी कलाप्पा पाटील (८०४७ लि.) यांनी विक्रमी दूध उत्पादन करून क्रमांक पटकावले. त्यांना व्हाईस चेअरमन शिवाजी कल्लाप्पा जाधव, संचालक तुकाराम सुबराव पाटील, नारायण बापू पाटील, सुरेश जाधव, ज्येष्ठ सभासद रामू तेऊरवाडकर, आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत संस्थेकडून ॲडव्हान्स रक्कम घेऊन दुसऱ्या संस्थेकडे दूध घालणाऱ्या सभासदांवर कायदेशीर कारवाई करणे, संस्थेच्या इमारतीची डागडुजी संचालक व सभासदांच्या वर्गणीतून करणे, सभासदांच्या गाय- म्हैस या पशुधनाचा विमा उतरवणे, चांगल्या प्रतीची दुधाळ जनावरे आणण्यासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करणे, मयत सभासदांची नावे कमी करणे, संस्थेला उच्च प्रतीचे दूध पुरवठा करणे, दुय्यम दर्जाचे दूध पुरवठा केलेस योग्य ती कारवाई करणे आदी विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत ईश्वर वर्पे, शंकर जाधव, गुरुनाथ परीट, शंकर कोले, नरसु पाटील, नरसु तेऊरवाडकर, कल्लाप्पा पाटील, तुकाराम तेऊरवाडकर, तुकाराम जोशी, विष्णू पाटील आदींनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक नाईक, प्रतीक कांबळे, सदा पाटील, भरत पाटील आदी सभासदांनी परिश्रम घेतले. संचालक पी. वाय. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment