आग्रा येथील छ.शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेकसाठी सामानगड, महिपाळगड व कलानिधीगड किल्ल्यांवरील जल संकलित, १७ ऑगस्ट रोजी साजरा होणार 'शिव चातुर्य' दिन - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2026

आग्रा येथील छ.शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेकसाठी सामानगड, महिपाळगड व कलानिधीगड किल्ल्यांवरील जल संकलित, १७ ऑगस्ट रोजी साजरा होणार 'शिव चातुर्य' दिन

कलानिधी गडावरून पाणी आणताना पत्रकार श्रीकांत पाटील, संपत पाटील, दीपक गावडे व शंकर पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   'आग्र्याहून सुटका' घटनेच्या (१७ ऑगस्ट १६६६) स्मृतीनिमित्त 'गरुड झेप मोहीम' अंतर्गत गेल्या सात वर्षांपासून आग्रा किल्ल्यावर 'शिव चातुर्य दिन' साजरा केला जातो. या निमित्य यंदा आग्रा येथे १७ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास स्वराज्यातील विविध ऐतिहासिक गड किल्ल्यांवरून संकलीत केलेल्या पाण्याने 'जलाभिषेक' करण्यात येणार आहे. 

महिपाळगड येथील ऐतिहासिक विहिरीतील पाणी आणताना गडावरील शिवभक्त मावळे

  यासाठी चंदगड परिसरातील पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड, महिपाळगड, सामानगड, वल्लभगड, राजहंसगड व कोकणातील किल्ल्यांवरुन संकलित करण्यात येत आहे. हे पवित्र जल पत्रकार व अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चे दक्षिण कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्रीकांत वैजनाथ पाटील, गरुड झेप संस्थेचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष राजाराम पाटील, डिजिटल मीडिया परिषद चंदगड तालुका अध्यक्ष संपत पाटील, चंदगड पत्रकार संघाचे सचिव चेतन शेरेगार, दीपक गावडे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर पाटील, शिवभक्त दीपक गावडे, सुखदेव भातकांडे, प्रकाश हेब्बाळकर आदी शिवभक्त दि. १३ ऑगस्ट रोजी आग्रा येथे रवाना होत आहेत. 

 जल संकलनाच्या अनुषंगाने आज दि. ८ रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ऐतिहासिक महिपाळगड किल्ल्यावरील पांडवकालीन विहिरीचे जल संकलित करण्यात आले. चंदगड पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिपाळगड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण भोंगाळे, सुरेश रामचंद्र पाटील, गणपत दिनकर सावंत व सेवानिवृत्त शिक्षक रामलिंग जानबा तुपारे यांनी तर गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ल्यावरील 'सात कमान विहिरीचे पाणी' शिवभक्त विजय टेंबुगडे व संतोष गडकरी (चेन्नेकुप्पी) व अखलाकभाई मुजावर (महागाव) यांनी संकलित करून पत्रकार संघाकडे सुपूर्द केले. याशिवाय दोन दिवसांपूर्वी पत्रकार संघाचे सदस्य तसेच शंकर विठोबा पाटील (कालकुंद्री) व अन्य शिवभक्तांनी चंदगड तालुक्यातील दुर्गम कलानिधी गडावरील विहिरीचे पाणी संकलित करून शिव चातुर्य दिन कार्यक्रमात आपला खारीचा वाटा उचलला. 

 या आधी किल्ले पारगड येथून विठ्ठल राघोबा शिंदे (पारगड) यांनी, राजहंसगड येळ्ळूर येथील विहिरीचे पाणी भाऊसाहेब तरळेकर (बेळगाव) यांनी तर गोव्यातील साखळी किल्ल्यावरील पाणी शिवभक्त राजाराम शिवाजी पाटील, पद्माकर वाळुंज व अमित दळवी या शिवभक्तांनी चंदगड पत्रकार संघाकडे पोहोच केले आहे. या सर्व शिवभक्तांचे गरुड झेप संस्थेचे अध्यक्ष छ. शिवाजी महाराजांचे तत्कालीन सरसेनापती सरनौबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती उर्फ आबा गोळे व पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. 

  सन २०२० पासून गरुडझेप मोहिमेंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन आग्रा येथे सुरू आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील आशिष शेलार शंभूराज देसाई आदीमंत्र्यांसह उत्तर प्रदेश राज्यातील मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

 या मोहीमेअंतर्गत औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेतून छ. राजे ज्या मार्गाने आग्रा ते स्वराज्याची तत्कालीन राजधानी राजगडावर पोहोचले त्याच मार्गाने सुमारे १३१० किलोमीटर अंतराची चार राज्य व ७८ शहरे व गावांतून पायी दौड (१७ ते २९ ऑगस्ट) सुरू करण्यात आली आहे. आग्रा येथे १६ व १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चंदगड पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज या पोर्टल चॅनेलवर' देश व जगभरातील सर्व शिवप्रेमींना पहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment