लोकभावना व तरुणांच्या उत्साहातून लक्ष्मीनगरात ‘वडाखालचा राजा’ची प्रतिष्ठापना - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2026

लोकभावना व तरुणांच्या उत्साहातून लक्ष्मीनगरात ‘वडाखालचा राजा’ची प्रतिष्ठापना


कोवाड : संजय पाटील, सी.एल. वृत्तसेवा

लोकभावना आणि तरुणांचा उत्साह लक्षात घेऊन यंदा लक्ष्मीनगर, कोवाड येथे ‘वडाखालचा राजा’ गणेशमूर्तीची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. लक्ष्मीनगर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मंडळाचे अध्यक्ष रामा मनवाडकर व उपाध्यक्ष विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांसह नागरिकांच्या उत्साहाला सकारात्मक दिशा देत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यावर मंडळाने भर दिला आहे.

गणेशोत्सवानिमित्त दररोज झिम्मा-फुगडीसह विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचे जतन व्हावे, तसेच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मंडळाच्या वतीने वल्लभ पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

२३ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर

गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नेत्र तपासणी, हाडांची तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कॅन्सर तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य सल्ला आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि युवकांचा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष रामा मनवाडकर व उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment