![]() |
| जी. एस. पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व तालुक्यातील सर्वात जुनी शिक्षण संस्था असलेल्या 'खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री' चे विद्यमान अध्यक्ष गुंडू सोमाना पाटील तथा जी. एस. पाटील सर यांना माध्यमिक शिक्षक संघ कोल्हापूर व शिक्षक लोकशाही आघाडी महाराष्ट्र यांच्याकडून दिला जाणारा मानाचा 'आदर्श संस्थाचालक पुरस्कार २०२६' देऊन नुकतेच कोल्हापूर येथे सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
![]() |
| मान्यवरांच्या हस्ते आदर्श संस्थाचालक पुरस्कार सपत्नीक स्वीकारताना जी. एस. पाटील सोबत मान्यवर व कुटुंबीय |
मागील वर्षी खेडूत शिक्षण संचालक मंडळाच्या निवडणूकीत भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर जी. एस. पाटील यांनी (केवळ दीड वर्षांपूर्वी) अध्यक्ष म्हणून संस्थेची सूत्रे हाती घेतली होती. आपल्या पारदर्शक कारभार, संस्थेतील सर्व विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी व संचालकांना सोबत घेऊन सरांनी आदर्श संस्थाचालक कसा असावा हे जिल्ह्याला दाखवून दिले. यामुळेच माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय प्रेरणादायी व संस्थेतील सर्व शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण कार्य करून घेऊन शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांच्यामध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केलेली धडपड यांची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.
सन १९५३ मध्ये खेडूत शिक्षण मंडळाची कालकुंद्री येथे स्थापना झाली हायस्कूलच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतलेल्या जी एस पाटील यांचे सध्याचे वय आहे ८४ वर्षे. या वयात ही त्यांच्या कामाचा उरक तरुणांनही लाजवणार आहे. शिक्षक म्हणून त्यांनी तु. कृ. कोलेकर यांच्या नेसरी येथील हायस्कूल मध्ये सन १९६५ मध्ये आपल्या सेवेची सुरुवात केली. तिथे दोन वर्षे सेवा केल्यानंतर खेडूत शिक्षण मंडळाच्या कालकुंद्री हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून ते १९६७ मध्ये रुजू झाले. त्यानंतर सन २००२ मध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होईपर्यंत ३५ वर्षे खेडूत शिक्षण मंडळाच्या कालकुंद्री, शिवणगे, हेरे, चंदगड या चार हायस्कूलमध्ये सेवा केली. सेवानिवृत्तीनंतरही निरंतर शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेत शिक्षण क्षेत्राशी त्यांनी ठेवलेली बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, नेतृत्व गुण, सामाजिक जाणीव, आणि शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल सहा दशके दिलेले योगदान. हा प्रवास कोणत्याही शिक्षण प्रेमीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणूनच समर्पक व सार्थ ठरला आहे.
कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांना प्राचार्य अभय कुमार साळुंखे (कार्याध्यक्ष स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर), खासदार धनंजय महाडिक, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अध्यक्ष जी. के. थोरात यांच्या हस्ते विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, अध्यक्ष श्रीराम साळुंखे, शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेश सचिव के. एस. ढोमसे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी खेडूत शिक्षण संस्थेचे शाहू फर्नांडिस, एम. बी. पाटील, शामराव मुरकुटे आदी संचालक, पत्नी सौ शीला गुंडू पाटील, चिरंजीव विनायक पाटील, मुलगी सौ. शोभा नंदकुमार पाटील व कुटुंबीय आदींची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment