चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा संघटक हरपला, 'जयवंत भाऊ पाटील गुरुजी' यांच्या निधनामुळे हळहळ - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2026

चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा संघटक हरपला, 'जयवंत भाऊ पाटील गुरुजी' यांच्या निधनामुळे हळहळ

  

जयवंत भाऊ पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     हेरे गावचे सुपुत्र, चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे (फेस्कॉम) अध्यक्ष, सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री . जयवंत भाऊ पाटील तथा ज. भा. पाटील गुरुजी यांचे मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य होते. 

    तसेच चंदगड तालुका जेष्ठ नागरीक (फेस्कॉम) संघटनेचे विद्यमान अध्यक्षही होते.  त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेवटपर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यांसाठी शासन दरबारी आवाज उठवला. १३ एप्रिल २०२५ रोजी ज्ञानेश्वर माऊली मंदीर दाटे (ता. चंदगड) येथे हजारो ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा घेऊन ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राचे ज्ञानबिंदू व मानबिंदू असून देशाचे खरे मावळे आहेत, ते देशाचे शिल्पकार आहेत. 

    राज्यातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर हा देशाचा खरा पोशिंदा आहे. पण तोच पोशिंदा म्हातारपणी कर्जबाजारी होऊन उपाशीपोटी हालअपेष्ठा सोसून जगतो आहे. त्यांना शासनाने पेन्शन द्यावी. ६० वर्षाच्या ज्येष्ठांना ६५ वर्षाप्रमाणे सवलती लागू कराव्यात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आजारासह व वयाच्या अटीशिवाय आरोग्यविमा योजना अंमलात आणावी. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे उभारावीत. ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत मिळावी. सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळावा. अशा विविध मागण्यांचा  शासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. 

      सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वाहून घेतलेले जयवंत भाऊ पाटील गुरुजी आपल्या गोडवाणीने सर्वांना आपलेसे करत.  आपली परिचित किंवा अपरिचित सुद्धा व्यक्ती बाजारात किंवा कुठेही भेटली तरी त्यांची सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ज. भा. पाटील गुरुजी यांनी आपल्या शैक्षणिक सेवा काळात गुडवळे, कन्या विद्यामंदिर चंदगड, हेरे, खालसा कोळिंद्रे, कळसगादे आदी शाळांमध्ये तळमळीने कार्य करत विद्यार्थी अर्थात देशाचे सुजाण नागरिक घडवले. त्यामुळे विद्यार्थी व पालक  वर्गात त्यांच्याबद्दल शेवटपर्यंत आदरभाव राहिला.

      त्यांच्या  पश्चात दोन विवाहित मुलगे व तीन मुली तसेच सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment