![]() |
| जप्त केलेले रानडुक्कराचे धड व कारवाईमध्ये सहभागी झालेले पाटणे वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावाच्या हद्दीत शिकार क केलेले रानडुक्कर पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांनी काल दि. २०/०२/२०२६ रोजी जप्त करून अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंद केला.
या संदर्भात वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी : वन विभागाला मिळालेल्या गुप्त बातमी वरुन वनक्षेत्रपाल पाटणे तसेच परिमंडळ कार्वेतील सर्व कर्मचारी यांचे समवेत ढोलगरवाडी मालकी गट नं. ६२३ मध्ये जाऊन पाहणी केली असता कोणी अज्ञात इसमांनी रानडुक्कर (Wild boar / sus scrofa) अनुसुची -II part A या वन्यप्राण्याची शिकार करुन तो विस्तावाच्या सहाय्याने भाजुन त्याचे शरीरावरील केस साफ करुन त्याचे डोके तोडुन शरीराचा बाकी लपवुन ठेवलेला भाग वन कर्मचाऱ्यांनी जप्त केला. तथापि डुक्कराचे डोके मिळुन आले नाही. या प्रकरणी वनरक्षक कार्वे यांचेकडील प्र.गु. रिपोर्ट क्र. WL-०१/२०२६ दि.२०-०२-२०२६ चा गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयातील आरोपी व रानडुक्कराच्या डोक्याचा तपास वनविभाग करत आहे.
गुन्हेकामाचा पुढील तपास धैर्यशिल पाटील (उपवनसंरक्षक कोल्हापूर), विलास काळे (सहाय्यक वनसंरक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे, वनपाल जॉन्सन डिसोजा, वनरक्षक देवेश्वर रावळेवाड, खंडु कोरे, खंडु कातखडे, मेघराज हुल्ले, श्रीमती साक्षी सपकाळ, विशाखा बास्कर, पूनम मदने, शिवाजी कांबळे, चंद्रकांत बांदेकर, पास्कल डिसोजा, वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर, वन्यजीव बचाव कर्मचारी बसवाणी नाईक आदींचे पथक करत आहे.
रानडुक्करांच्या उपद्रवा बाबत वन विभागाकडून ठोस कारवाईची गरज
गेल्या काही वर्षात चंदगड तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या शिवारातील पिकांची रानडुकरांच्या कळपांकडून मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू आहे. आता तोंडाला आलेल्या पिकांचे सुरू असलेल्या नुकसानीमुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. याबाबत चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. रानडुकरांची शिकार बंद झाल्याने त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने यापुढेही हा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे शासनाने नवीन कायदा करून रानडुकरांच्या शिकारी वरील बंदी उठवावी. अशा प्रकारची मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे. हा प्रश्न एका चंदगड तालुक्यात पुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात उपद्रवकारक ठरत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा पारित व्हावा त्यासाठी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment